"उजनी' शंभर टक्के भरताच धरणग्रस्तांनी केले ढोल-ताशाच्या गजरात जलपूजन

अण्णा काळे
Wednesday, 2 September 2020

उजनी धरण 30 ऑगस्ट रोजी शंभर टक्के भरताच उजनी धरणासाठी त्याग केलेल्या व उजनी जलाशय काठावर विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांनी ढोकरी (ता. करमाळा) येथील उजनी जलाशय काठावर ढोल- ताशाच्या गजरात उजनीच्या पाण्याचे खणा-नारळाने ओटी भरून जलपूजन केले.

करमाळा (सोलापूर) : उजनी धरण शंभर टक्के कधी भरणार, याची संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी वाट पाहून होते. सोलापूर जिल्ह्यासाठी तर उजनी धरण वरदायिनीच आहे. 30 ऑगस्ट रोजी उजनी धरण शंभर टक्के भरताच उजनी धरणासाठी त्याग केलेल्या व उजनी जलाशय काठावर विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांनी ढोल- ताशाच्या गजरात उजनीच्या पाण्याचे खणा-नारळाने ओटी भरून जलपूजन केले. 

हेही वाचा : मोठी बातमी! राज्यातील परिचारिकांचे राज्यव्यापी आंदोलन; "या' आहेत मागण्या 

ढोकरी (ता. करमाळा) येथील उजनी जलाशय काठावर सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, करमाळा पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजी बंडगर, "आदिनाथ'चे अध्यक्ष धनंजय डोंगरे, अजित तळेकर, जिल्हा परिषद सदस्या सविताराजे भोसले, देवानंद बागल, उपसभापती दत्ता सरडे, पंचायत समिती सदस्य पै. अतुल पाटील, धुरा कोकरे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. या वेळी "आदिनाथ'चे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, ज्ञानेश पवार, दत्ता देशमुख, संघर्ष समितीचे उपाध्यक्ष भारत साळुंके, महेंद्र पाटील, दत्ता देशमुख, दादा सातव, ढोकरीचे सरपंच महादेव वाघमोडे, पंचमराजे भोसले, शुभम बंडगर, शिवा खरात यांच्यासह मोठ्या संख्येने उजनी धरणग्रस्त उपस्थित होते. 

हेही वाचा : Breaking ! सोलापूर महानगरपालिकेने केली गणेश मूर्तीची विटंबना; "यांनी' दिली पोलिसांत तक्रार 

या वेळी प्रा. शिवाजी बंडगर यांनी, उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे, अशी मागणी करत सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी भीमा नदीतून न सोडता ते समांतर जलवाहिनीतून द्यावे, अशी मागणी केली. 

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे म्हणाले, उजनी धरण शंभर टक्के भरण्याच्या प्रतीक्षेत संपूर्ण जिल्हा होता. उजनी धरण भरल्याचा आनंद साजरा करताना या पाण्याचा योग्य पद्धतीने वापर होणे गरजेचे आहे. तसेच धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन केले पाहिजे. आवश्‍यकतेपेक्षा जास्त पाणी सोडल्याने धरण मायनसमध्ये जात असल्याच्या तक्रारी कायम होत असतात. त्यामुळे उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांचे हाल होतात. याची जाणीव ठेवून उजनीच्या पाण्याचे नियोजन केले पाहिजे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As soon as the Ujani dam was hundred percent full water worship was held to the sound of drums