धक्कादायक ! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या तीन बालकांना मातेने दिले दुसऱ्यांच्या ताब्यात

शशिकांत कडबाने 
Wednesday, 2 September 2020

अकलूज येथील एका महिलेने अनैतिक संबंधातून मुलाला जन्म देऊन त्यांची विल्हेवाट लावल्याची तक्रार वाघोली (ता. माळशिरस) येथील प्रमोद मिसाळ यांनी दिली. या तक्रारीनुसार अकलूज पोलिसांनी तपास केला असता, या महिलेने अनैतिक संबंधातून तीन बाळांना जन्म दिला व त्यांना अवैधरीत्या दुसऱ्यांच्या ताब्यात दिल्याचे समोर आले. या घटनेमुळे पोलिसही चक्रावले आहेत. 

अकलूज (सोलापूर) : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या स्वतःच्या तीन मुलांना मातेने बेकायदेशीरपणे दुसऱ्यांच्या ताब्यात दिल्याचा प्रकार अकलूज येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी "त्या' मातेसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. 

हेही वाचा : "उजनी' शंभर टक्के भरताच धरणग्रस्तांनी केले ढोल-ताशाच्या गजरात जलपूजन 

याबाबत सविस्तर माहिती अशी, की एका महिलेने अनैतिक संबंधातून मुलाला जन्म देऊन त्यांची विल्हेवाट लावल्याची तक्रार वाघोली (ता. माळशिरस) येथील प्रमोद मिसाळ यांनी दिली. या तक्रारीनुसार अकलूज पोलिसांनी तपास केला असता या महिलेचे करमाळा येथील कालिदास पवार याच्याशी अनैतिक संबंध जुळले. या संबंधातून तिने 2016 मध्ये करमाळा येथील एका हॉस्पिटलमध्ये एका मुलीला जन्म दिला. अनैतिक संबंधातून जन्मलेले हे बाळ जवळ सांभाळणे अवघड असल्यामुळे ही महिला, कालिदास पवार, अश्विनी पवार यांनी केडगाव (ता. दौंड) येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन यांना दिले. 

हेही वाचा : Breaking ! सोलापूर महानगरपालिकेने केली गणेश मूर्तीची विटंबना; "यांनी' दिली पोलिसांत तक्रार 

त्यानंतरही अनैतिक संबंधातून या महिलेने 2018 मध्ये अकलूज येथील दवाखान्यामध्ये दुसऱ्या प्रसुतीत मुलाला जन्म दिला. या वेळी जन्मलेले बाळ दवाखान्यातील परिचारिका सुलोचना मोरे हिला बेकायदेशीरपणे दिले. त्यानंतर सुलोचना मोरे हिला कोणताही कायदेशीर अधिकार नसताना तिने हे बाळ परस्पर पंचशीलनगर-अकलूज येथील दमयंती दिलीप कसबे व उलवंती दिलीप कसबे यांना दिले. त्यानंतरही अनैतिक संबंधातून अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात 25 जुलै रोजी तिसऱ्यांदा प्रसूत होऊन मुलाला जन्म दिला. या दवाखान्यात भरती होताना तिने स्वत:चे नाव वैशाली रोहित जाधव असे सांगितले व जन्मलेले बाळ राणी रामलाल बंदपट्टे, अनिल बंदपट्टे व अनिलची पत्नी (रा. अकलूज) यांच्याकडे सुपूर्द केले. 

प्रमोद मिसाळ यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरून या प्रकाराची चौकशी केल्यानंतर या महिलेला पोलिसांनी सोलापूरच्या महिला बाल समाज कल्याण समितीच्या अध्यक्षांसमोर उभा केले. तेव्हा महिला बाल कल्याण समितीने तीनही बालकांचा शोध घेऊन समितीसमोर हजर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर केडगाव येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन यांच्याकडे पत्रव्यवहार करून चौकशी केली असता त्यांनी हे बालक पुढे दत्तक दिल्याचे सांगितले. तसेच 2018 व 2020 मध्ये जन्मलेले बाळ ताब्यात घेण्याकरिता सुलोचना मोरे, दमयंती दिलीप कसबे, उलवंती दिलीप कसबे, राणी बंदपट्टे, अनिल बंदपट्टे व त्यांची पत्नी यांना शोधण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही बाळांची विक्री करण्यासाठी किंवा इतर गैरमार्गासाठी त्यांचा वापर करण्याकरिता ते पळून गेल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. 

याबाबत या सर्व आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद एएसआय महंमद हरून नायकवडी यांनी दाखल केली आहे. डीवायएसपी नीरज राजगुरू व पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय वैभव मारकड, पोलिस उपनिरीक्षक सारिका शिंदे, एएसआय महंमद हरून नायकवडी एएसआय श्रीकांत निकम, पोलिस कॉन्स्टेबल नाजमीन तांबोळी यांनी या प्रकरणाचा तपास केला. पुढील तपास एएसआय नायकवडी करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The mother gave three inborn children born to someone without any legal process