लाॅकडाउनचा इलेक्ट्रीक व्यवसायाला बसला शाॅक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

कोरोना पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनने इलेक्‍ट्रिक साहित्य विक्री दुकाने मागील दोन महिन्यांपासून बंद आहेत. परिणामी, मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांचा उन्हाळ्याचा तसेच गुढीपाडवा, अक्षय तृतिया व लग्नाचा सीझनही गेल्याने व्यवसाय बुडाला. उन्हाळ्यासाठी छोट्या दुकानदारांनी बॅंकांचे कर्ज काढून तर काहींनी रोख पैसे देऊन साहित्य भरले. 

सोलापूर: उन्हाळ्यात नवीन इलेक्‍ट्रिक साहित्य जसे मिक्‍सर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, कूलर आदी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. त्यामुळे लाखो रुपये गुंतवून नवीन इलेक्‍ट्रिक साहित्यांची खरेदी केली व दुकान विविध साहित्यांनी भरले. मात्र, ऐन उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कोरोना विषाणूने इलेक्‍ट्रिक दुकानदार व इलेक्‍ट्रिशियन यांचे उपासमारीसह भविष्यही नाउमेद करून ठेवले आहे. आता दुकाने उघडली गेली नाहीत तर आमचा वर्षभराचा व्यवसाय बुडणार आहे, अशी भीती इलेक्‍ट्रिक साहित्य विक्री दुकानदारांनी व्यक्‍त केली. 

हेही वाचाः तुळजापुर रोड नाका पुलाखाली परप्रांतीयांना आश्रय 

कोरोना पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनने इलेक्‍ट्रिक साहित्य विक्री दुकाने मागील दोन महिन्यांपासून बंद आहेत. परिणामी, मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांचा उन्हाळ्याचा तसेच गुढीपाडवा, अक्षय तृतिया व लग्नाचा सीझनही गेल्याने व्यवसाय बुडाला. उन्हाळ्यासाठी छोट्या दुकानदारांनी बॅंकांचे कर्ज काढून तर काहींनी रोख पैसे देऊन साहित्य भरले. 

हेही वाचाः लॉकडाउनच्या काळात 161 साप पकडले 

कोरोना संकटात  अशीच परिस्थिती वायरमन व इलेक्‍ट्रिक साहित्य दुरुस्ती करणाऱ्यांवर ओढवली आहे. उन्हाळ्यात सीलिंग फॅन, टेबल फॅन, मिक्‍सर, कूलर आदी जुन्या वस्तू दुरुस्ती करणाऱ्या इलेक्‍ट्रिशियन यांनाही चांगला रोजगार मिळत असतो. मात्र, लॉकडाउनने हातावर पोट असणाऱ्या कारागिरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. एखादी वस्तू दुरुस्तीसाठी आली तरी त्यासाठी आवश्‍यक सुटे साहित्य दुकाने बंद असल्याने मिळत नाहीत. परिणामी, कुशलता असून व समोर रोजगार असूनही वायरमन व इलेक्‍ट्रिक साहित्य दुरुस्ती करणारे 
हतबल झाले आहेत. 
उन्हाळ्यात मिक्‍सर, पाण्याची मोटार, बोअरवेलची मोटार आदी वस्तू दुरुस्तीची कामे असतात. यासाठी बेअरिंग, कंडेन्सर, सॉल्डरिंग तार, मोटारीचे ब्लेड, वायंडिंग तार, बुशिंग, शाफ्ट, वायर, नटबोल्ट, आदी सुट्या साहित्यांची गरज असते. लॉकडाउनने दुकाने बंद असल्याने सुटे साहित्य मिळत नाहीत. त्यामुळे वायरमन, इलेक्‍ट्रिक साहित्य दुरुस्ती करणाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. 
दुकानात लाखोंचे साहित्य विक्रीस ठेवले आहेत. यावर्षी या साहित्यांची विक्री झाली नाही, तर अनेक साहित्य खराब होण्याची शक्‍यता असते. तसेच गुंतवलेले भांडवलही वाया जाणार. उन्हाळ्याचा सीझन अजून 15 ते 20 दिवस शिल्लक आहे. निदान या अल्प कालावधीत या वस्तू विकण्यासाठी प्रशासनाने सम-विषम तारखेप्रमाणे दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी. प्रशासनाने घालून दिलेल्या सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केले जाईल. यामुळे इलेक्‍ट्रिक साहित्य दुरुस्ती करणाऱ्यांना सुटे भाग मिळू शकतील. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करून दुकाने उघडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी आहे. 

व्यवसायाला जबर फटका 
उन्हाळ्याच्या सीझनसाठी पंखे, कूलर आदींसाठी लाखोंची गुंतवणूक केली आहे. मात्र, कोरोनाने सुरू असलेल्या लॉकडाउनने आमचा वर्षभराचा व्यवसाय मार खाल्ला आहे. दुकानाचे भाडे, कामगारांचा पगार, बॅंकांचे व्याज कसे भरणार याची चिंता लागली आहे. या वस्तूंच्या विक्रीसाठी आता सम-विषम तारखांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी. 
- विठ्ठल दामजी, इलेक्‍ट्रिकल दुकानदार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: electric shopkeepeers shocked due to lockdown