कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगडावर चित्तथरारक चढाई 

प्रकाश सनपूरकर
Sunday, 27 September 2020

दोन वर्षापासून आमची टीम प्रबळगड कलावंतीण दुर्ग करण्याचे ठरवले होते, पण प्रत्येकाला रोजच्या धावपळीतून वेळ मिळत नव्हता. 

सोलापूरः एका बाजुला कडा तर दुसरीकडे खोल दरी या दोन्हीच्या मध्ये दीड फुटाची पायवाट चालत सरळ नव्वद अंशाच्या कोनातील कलावंतीण दुर्ग आणि प्रबळ गड सर करताना आलेला अनुभव आजही थरारक वाटतो असा अनुभव बाळेचे पर्यटक व ट्रेकर संतोष धाकपाडे यांनी सांगितला. 

हेही वाचाः माझी रायगडवारी 

या साहसी ट्रेकबद्दल संतोष धाकपाडे सांगत होते. 

हेही वाचाः गेंटुआ लाडू, नम्रतेमधील श्रीमंती व रंगारंग लोककलेचा आनंद 

दोन वर्षापासून आमची टीम प्रबळगड कलावंतीण दुर्ग करण्याचे ठरवले होते, पण प्रत्येकाला रोजच्या धावपळीतून वेळ मिळत नव्हता. 
90 अंशामध्ये असलेला हा किल्ला आव्हानात्मक होता. पण महादेव, विकास, किरण, धनंजय हे मित्र खूप मागे लागले की हा किल्ला सर करायचा. मग मी पण मन घट्ट केलं आणि ठरवलं की जायचं. दोन वर्षानंतर या किल्ल्यावर जायचं नियोजन आखले. 
कलावंतीण दुर्ग व प्रबळगड हे दोन किल्ले सर करण्याचे ठरले. मी, महादेव डोंगरे आणि नवखा त्याने कधीच ट्रेकिंग न केलेलं असलेला असा आमचा शुभम विभुते असे तिघे निघालो. ठरल्याप्रमाणे सकाळी साडेपाच वाजता पिंपरी चिंचवडहुन आमची गाडी निघाली. संख्या वाढल्यामुळे दोन कार करावे लागल्या. सोबत आमच्या विकास, मनोज, सुदर्शन, महादेव, शुभम आदी सर्व जण निघालो. . 
ठाकुरवाडी गावातून वर गडावर जायला एक तास लागतो. रस्ता खूप खडतर आहे आणि उभी चढण असल्यामुळे दमछाक होते. आमचाही झाला कारण कुठलाही सराव नसताना आम्ही दोन गड सर करण्यासाठी निघालो होतो. 
कसेबसे शेवटी आम्ही दुपारी गडावर पोहोचलो. प्रबळगडाचा माथा म्हणजे एक पठार आहे. त्या पठारीचा संपूर्ण भाग जंगलाने व्यापलेला आहे. या जंगलात तरस, रानडुक्कर, उदमांजर, सयाळू, साप, विंचू असे अनेक वन्यजीव तेथे आहेत. गडावर पोहोचल्यावर एक गणेश मंदिर, पाण्याचे टाकं तीन-चार वाडे, काळा बुरुज त्या बुरुजावरून दिसणारे मोरबे धरण, माथेरान, माणिक गड,, कर्नाळा हे सर्व तेथून पाहायला मिळतात. तसेच बोरीची सोंड यासारखे ठिकाण येथे आहेत. काळ्या बुरुजावर एक मोठा चून्याचा ढीग आहे. बहुतेक किल्ला बनण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असावा. प्रबळगडावरुन कलावंतीण दुर्गचे मोहक दृश्‍य आपल्याला पाहायला मिळते. आम्ही सर्वांनी आराम करून परत गडावरून खाली उतरायला सुरुवात केली. अर्धा गड उतरल्यावर कलावंतीणला जाण्यासाठी एक दुसरा मार्ग लागतो. आम्ही सर्वांनी कलावंतीन च्या दिशेने डोंगराच्या कडेने एक पायवाटेला लागलो. 
एका बाजूला कडा तर दुसऱ्या बाजूला खोल दरी. पायवाटेची रुंदी मात्र दीड फूट होती. आम्ही सर्वजण अर्ध्या तासात कलावंतीन च्या पायथ्याशी पोहोचलो. थोडीशी विश्रांती घेतली. गडाच्या पायथ्याशी बसून वरती पहात होतो हा किल्ला कसा बनला हाच विचार मनामध्ये येत होता, कारण 90 अंशांच्या कोनामध्ये असलेला हा डोंगर आहे. 
थोड्या विश्रांती नंतर आम्ही गडावर चढाई सुरुवात केली. तिकडे निघण्याच्या अगोदर मनातली भीती दूर करत होतो मन घट्ट केलं आणि मीही सुरुवात केली. वीस ते पंचवीस मिनिटात गडाच्या एका टोकाला आम्ही पोहोचलो. शेवटचा एक टप्पा होता तो टप्पा अवघड होता. एका दगडाला वरून दोन रस्सी बांधलेली होती. त्याचा आधार घेऊन तो शेवटचा टप्पा गाठायचा होता. त्या शेवटच्या टप्प्यावर आम्ही पहिल्यांदा कसे जायचे पाहत होतो. वर जाण्यासाठी विकास ने सुरुवात केली चार-पाच प्रयत्नानंतर तो वर गेला. त्याच्यानंतर शुभम, मी, महादेव, किरण आणि आमचे सर्व सहकारी मित्र वरती गेलो. मी वरती पोचल्यावर दंडवत घेऊन गडाला प्रणाम केला. 
या गडावर शेवटी जायचं ठरलं होतं तोच आम्ही सर केला यावर माझा विश्वास बसत नव्हता. गडावर पोहोचल्यावर आम्ही फोटोग्राफी केली. थोडावेळ बसलो आणि गड उतरायला चालू केलं. गडाच्या पायथ्यापर्यंत काही मिनिटातच आम्ही पोहोचलो. तिथून प्रबळमाची गावात आलो. बॅटरी तसेच मोबाईलचे बॅटरीच्या प्रकाशात आम्ही ठाकूरवाडी गावात सायंकाळी पोहोचलो. प्रबळगड कलावंतीण दुर्ग साठी आम्हाला पूर्ण व्यवस्थित पाहण्यासाठी काही तास गेले. दोन्ही गड सर केल्यावर मन प्रसन्न झाले आणि दोन वर्षांपासून वाट पाहिलेलं स्वप्न पण पूर्ण झाले. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exciting climb on Kalavantin fort and Prabalgad