बळीराजा लॉकडाउन ! 70 हजार कोटींहून अधिक फटका 

06shetkari2_20171018453.jpg
06shetkari2_20171018453.jpg

सोलापूर : दूष्काळ, महापूर अन्‌ अतिवृष्टीच्या संकटातून सावरत असतानाच बळीराजापुढे कोरोनाचे संकट उभारले आणि संसाराची संपूर्ण घडीच विस्कटली. त्यामुळे बळीराजाला तब्बल 70 हजार कोटींहून अधिक रुपयांचा फटका बसला आहे. दुसरीकडे बळीराजाला सरकार व कारखानदारांकडून अनुदान, नुकसान व एफआरपीपोटी तब्बल 27 हजार कोटींहून अधिक रुपये अपेक्षित आहेत. मात्र, कोरोनामुळे शासकीय महाभरतीतून मुलाला नोकरी लागण्याची आशाही आता धूसर झाली असून बॅंकांचे कामकाज दरवाजे बंद करुन सुरु असल्याने सावकारांचा तगादा मागे लागला आहे. 

राज्यातील एक कोटी 53 लाख शेतकऱ्यांपैकी एक कोटी आठ लाख शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर विविध बॅंकांचा तब्बल सव्वालाख कोटींचा बोजा आहे. दुष्काळ, अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट अशा नैसर्गिक संकटाचा सामना करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, त्यांच्या विवाहाची जबाबदारी पेलणाऱ्या बळीराजाची घडी आता कोरोनामुळे विस्कटल्याने तो पुन्हा सावकाराचा दरवाजा ठोठावत आहे. द्राक्ष, टोमॅटो, वांगी, केळी, भाजीपाल्याचा अक्षरश: उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतमाल बांधावर फेकून द्यावा लागत आहे. सरकारी कार्यालये नावालाच उघडी असून त्याठिकाणी अधिकारी नाहीत, तर लोकप्रतिनिधी घरातच लॉकडाउन असल्याने अडचणी सांगायच्या कोणाला, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. विविध अनुदानाची प्रतीक्षा करीत दोन लाखांच्या कर्जमाफीतून पुन्हा जोमाने शेती फुलविण्याचे स्वप्न पाहिले, मात्र कोरोनाच्या वैश्‍विक संकटामुळे त्याचीही परिपूर्ती झाली नाही. दरम्यान, या वर्षी दोनवेळा अवकाळीचा फटका बसला मात्र, नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश सरकारने देऊनही लॉकडाउनमुळे पंचनामेच झाले नाहीत. 

हतबल बळीराजापुढील अडचणी... 

  • राज्यातील 38 लाख नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाची प्रतीक्षा 
  • या वर्षीच्या अवकाळीने तीन हजार कोटींचे नुकसान, मात्र पंचनामेच झाले नाहीत 
  • सुमारे 16 लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेतच : जूननंतर सुरु होणार दोन लाखांवरील कर्जमाफीची प्रक्रिया 
  • बॅंकांच्या कर्ज वसुलीला स्थगिती : सावकारांचा कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना तगादा 
  • दूध भुकटीचे 187 कोटी मंजूर, मात्र हाती दमडाही नाही : एफआरपीची आठशे कोटींपर्यंत रक्‍कम थकीत 
  • महापूर अन्‌ अतिवृष्टीत नुकसान झालेल्यांची बाराशे कोटींची मदत तहसिलदारांकडेच : वाटप झाले बंद 
  • लॉकडाउनमुळे बळीराजाला तब्बल 70 हजार कोटींहून अधिक फटका : आता सरकारी मदतीकडे नजरा 

नियमित कर्जदारांच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय नाहीच 
दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया आता लॉकडाउनमुळे थांबविण्यात आली आहे. नियमित कर्जदारांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय झाला, मात्र शासनाकडून अध्यादेश निघालेला नाही. दोन लाखांवरील शेतकऱ्यांनी उर्वरित रक्‍कम भरल्याशिवाय कर्जमाफीचा लाभ मिळणार नसून त्याची प्रक्रिया लवकरच सुरु होईल. 
- डॉ. आनंद जोगदंड, अप्पर आयुक्‍त, सहकार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com