निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदाच भरला "हा' तलाव शंभर टक्के ! आता योग्य नियोजन होण्याची शेतकऱ्यांची मागणी 

Tisangi Talav
Tisangi Talav

तिसंगी (सोलापूर) : तिसंगी सोनकेसह परिसरातील दहा गावांना वरदान ठरलेला तिसंगी सोनके तलाव 100 टक्के भरला आहे. तलाव भरल्याने परिसरातील शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे. तलावाच्या निर्मितीपासून आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच तिसंगी तलाव हे उन्हाळी आवर्तनाच्या पाण्याने 100 टक्के भरून घेतले. अधिकारी वर्गाच्या योग्य नियोजनामुळे तलाव वेळेत पूर्ण क्षमतेने भरला. 

गेली दहा वर्षे झाली दुष्काळाने होरपळत असलेला शेतकरी राजा तलाव भरल्याने व समाधानकारक पाऊस झाल्याने आनंदात आहे; पण कोरोना महामारीमुळे पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेती मालाला योग्य बाजारभाव नाही, शेतकऱ्यांचा माल कवडीमोल दराने विकला जात आहे. पण पाण्यामुळे सर्वसामान्य शेतकरी वर्गासाठी शेतीचा विकास करण्यास ही सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. पंढरपूर तालुका हा मध्यम दुष्काळी तालुक्‍यांच्या यादीतील तालुका आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील तिसंगी, सोनके, लोणारवाडी, उंबरगाव, बोहाळी, गार्डी, पळशी, सुफली, गादेगाव, उपरी, जैनवाडी आदी गावांना याच्या हक्काचे पाणी मिळवून दिले जात नव्हते. यामुळे शेतीचा विकास थांबला, पर्यायाने तालुक्‍याचा देखील विकास रखडला आहे. परंतु माजी आमदार गणपतराव देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, आमदार शहाजी पाटील, आमदार भारत भालके यांच्या प्रयत्नाने सांगोला, पंढरपूर तालुक्‍यास हक्काचे पाणी मिळाले आहे. 

तिसंगी तलावाची निर्मिती झाल्यापासून एकदाही उन्हाळी आवर्तनाचे पाणी तलावास मिळाले नव्हते. पण वेळेत पाऊस पडल्याने तिसंगी तलावाच्या इतिहासात प्रथमच उन्हाळी आवर्तनाने तलावाची तहान भागविली आहे. यामुळे तलाव लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतीचा विकास करण्यासाठी मोठी संधी सापडली असून, यापुढील काळात देखील तालुक्‍याच्या हक्काचे सर्व पाणी तालुक्‍याला मिळवून दिले जाणार आहे. तसेच सांगोला भागातील चिंचोली तलावासह पाझर तलाव भरून घेणार असल्याचे माजी आमदार गणपराव देशमुख यानी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

जिल्हा परिषद सदस्या शोभा वाघमोडे म्हणाल्या, तिसंगी-सोनके तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसरातील शेतकरी समाधानी आहे. पुढील काळात अधिकारी वर्गाने पाण्याचे योग्य नियोजन करावे. 

सहकार शिरोमणी साखर कारखान्यचे संचालक भारत कोळेकर म्हणाले, गेली दहा वर्ष दुष्काळाने शेतकरी होरपळत आहे. पाण्यासाठी सतत आंदोलने करावी लागली. पण प्रथमच आंदोलन न करता सोनके तलाव भरला. परिसरातील शेतकरी आनंदात आहे. 

विसंगी पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी अभिजित म्हेत्रे म्हणाले, तिसंगी-सोनके तलाव हा 996 एमसीएफटी क्षमतेचा असून, तलाव परिसर, धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने तलाव भरण्याचे नियोजन केले. आजमितीस तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. 

सोनकेचे माजी सरपंच दत्तात्रय खरात म्हणाले, तिसंगी सोनके तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. आम्हा शेतकऱ्यांना आनंद आहे. पण तलावाच्या सांडव्यातून पाणी सोडू नये. पाणी सोडले तर शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com