esakal | लॉकडाउनच्या धास्तीने गडगडला कांदा ! शेजारी राज्यातील कोरोनाच्या निर्बंधांचा परिणाम 

बोलून बातमी शोधा

Onion}

मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या संदर्भात होणाऱ्या अनेक निर्बंधांच्या धास्तीचा परिणाम कांदा बाजारावर झाला आहे. कांदा निर्यातीच्या बाबत अद्याप ठोस निर्णय न झाल्याने कांदा उत्पादक अडचणीत आले आहेत. सातत्याने घसरणारी आवक, इतर राज्यांत कांदा पाठवण्याच्या अडचणी, कोरोनाच्या संदर्भात घातले गेलेले निर्बंध यामुळे अख्खी बाजारपेठ विस्कळित झाली आहे. 

लॉकडाउनच्या धास्तीने गडगडला कांदा ! शेजारी राज्यातील कोरोनाच्या निर्बंधांचा परिणाम 
sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूर : मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या संदर्भात होणाऱ्या अनेक निर्बंधांच्या धास्तीचा परिणाम कांदा बाजारावर झाला आहे. कांदा निर्यातीच्या बाबत अद्याप ठोस निर्णय न झाल्याने कांदा उत्पादक अडचणीत आले आहेत. सातत्याने घसरणारी आवक, इतर राज्यांत कांदा पाठवण्याच्या अडचणी, कोरोनाच्या संदर्भात घातले गेलेले निर्बंध यामुळे अख्खी बाजारपेठ विस्कळित झाली आहे. गुरुवारी (ता. 4) कांद्याचे भाव 2700 रुपयांपर्यंत घसरले आहेत. अजूनही या बाजारावरील कोरोनाचे सावट कमी होत नसल्याने ही अडचण झाली आहे. 

नवीन कांदा बाजारात येत होता तेव्हा सुरवातीला कांद्याचे भाव पाच हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत पोचले होते. नंतर हा आकडा 5 हजार 900 रुपयापर्यंत गेला होता. विशेष म्हणजे या वर्षी सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. त्यामुळे कांदा उत्पादकांना चांगला लाभ मिळेल असा अंदाज होता. उत्पादन खर्चाच्या तुलनेत कांद्याला भाव अधिक मिळणे अपेक्षित होते. 

मागील पंधरवडाभरापासून कोरोनाच्या अनेक प्रकारच्या घटना सुरू आहेत. सोलापूर शहरामध्ये रात्री 11 ते सकाळी सहा या कालावधीत संचारबंदी लागू झाली. बाहेरगावावरून कांद्याची ने- आण करणाऱ्या वाहनांची त्यामुळे अडचण झाली. त्या पाठोपाठ कर्नाटकमध्ये ये-जा करणाऱ्या लोकांसाठी तपासणीचे निकष कडक करण्यात आले. त्यामुळे कांद्याची ने-आण करताना नेमके काय करावे लागणार, याबाबत कर्नाटक सरकारच्या सूचना समजून घेत माल वाहतुकीचा प्रश्‍न सोडवणे कठीणच झाले. 

या सर्व प्रकारांमुळे काही प्रमाणात आवक मर्यादित झाली. कमी झालेली आवक प्राधान्याने जिल्ह्याबाहेरील आवक होती. स्थानिक शेतकरी लॉकडाउनच्या भीतीने लवकर कांदा विकून मोकळा होण्याच्या घाईत आहेत. त्यामुळे कांद्याचे भाव हळहळू कमी होत गेले. 

चारच दिवसांच्या अंतरात कांद्याचा भाव 5000 रुपयांवरून 3500 रुपयांवर आला. त्यानंतर भाववाढ होईल अशी अपेक्षा होती. मात्र आंध्र प्रदेशात किरकोळ व्यापाऱ्यांनी कोरोनामुळे माल उतरवून घेणे व विक्री करण्यास अडचणी उभ्या केल्या. सोलापुरातून सर्वाधिक कांदा हा आंध्र प्रदेश व तमिळनाडूमध्ये जातो. या सर्व बाजारावर कोरोनाच्या धास्तीचा परिणाम वाढत चालला आहे. अशा स्थितीत कांद्याची आवक कमी झाली व बाहेर कांदा जाण्याच्या अडचणी असल्याने कांद्याचा भाव 2700 रुपये प्रति क्विंटलवर पोचला आहे. 

कांदा बाजार गडगडण्याची कारणे 

  • कोरोनाबद्दल अफवाबाजी 
  • इतर राज्यातील वाढते कोरोना निर्बंध 
  • आवक झाली कमी 
  • बाहेरील राज्यात कांदा पाठवण्याचा प्रश्‍न 
  • शेतकऱ्यांना लॉकडाउनची धास्ती 
  • इतर राज्यातील तेथील स्थानिक आवक सुरू 
  • दुसऱ्या फेरीचा कांदा सुरू झाल्याने भावावर परिणाम 

संपादन : श्रीनिवास दुध्याल