अवकाळीच्या मदतीपासून बळीराजा दूरच : नऊशे कोटींचे वाटपच नाही 

तात्या लांडगे
Thursday, 27 February 2020

  • खाते क्रमांकासाठी तलाठ्यांकडून व्हॉटस्‌अपचा वापर 
  • तीन महिन्यांपासून तहसिलदारांच्या खात्यातच पैसे पडून 
  • तलाठ्यांकडून याद्या मिळाल्या नसल्याने रक्‍कम पडून : तहसिलदारांचे स्पष्टीकरण 
  • मार्चएण्डपर्यंत मदतीची रक्‍कम वितरीत न झाल्यास शासनाला होणार जमा 

सोलापूर : राज्य सरकारने अवकाळी नुकसानग्रस्तांसाठी केलेली सात हजार 309 कोटी 36 लाख 65 हजारांची मदत मार्चएण्डपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अन्यथा पैसे शासनाला परत पाठवावे लागतील, असे मदत व पुनवर्सन विभागाने स्पष्ट केले. तरीही सद्यस्थितीत तहसिलदारांच्या खात्यावर 900 कोटींहून रक्‍कम पडूनच आहे. शेतकऱ्यांकडे मल्टिमिडिया मोबाइल नसतानाही तलाठी व्हॉटस्‌अपवरुन खाते क्रमांक देण्याचे आवाहन करीत असल्याचे चित्र समोर आले असून आता ही रक्‍कम शासनाला परत जाणार, अशी भिती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. 

हेही नक्‍की वाचा : भाजप खासदार डॉ. महास्वामी उच्च न्यायालयात 

ऑक्‍टोबर- नोव्हेंबरमध्ये राज्यात झालेल्या अवेळी पावसाचा फटका राज्यातील 349 तालुक्‍यांना बसला. त्यामध्ये एक कोटी तीन लाख शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, जालना, औरंगाबाद, रायगड, सिंधुदूर्ग, नाशिक, जळगाव, नगर, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर व वर्धा यासह अन्य जिल्ह्यांमधील सुमारे 23 लाख शेतकरी अवकाळीच्या मदतीपासून दूरच आहेत. सोलापुरातील उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. दुसरीकडे तलाठ्यांकडून शेतकऱ्यांची माहिती व खाते क्रमांक येईल, तशी रक्‍कम वितरीत केली जात असल्याचे तहसिलदार सांगत आहेत. आता मार्चएण्डपर्यंत मदतीची रक्‍कम वितरीत न झाल्यास शिल्लक रक्‍कम शासनाला परत पाठवावी लागणार आहे. गतवर्षीही नैसर्गिक आपत्तींचे सुमारे पाचशे कोटी रुपये शासनाला परत करावे लागले होते. 

हेही नक्‍की वाचा : खुषखबर ! गाड्यांच्या वेग वाढीला रेल्वे बोर्डाची मान्यता 

मार्चपर्यंत मदतीची रक्‍कम वितरीत करावी 
अवकाळीमुळे नुकसान झालेल्या एक कोटी तीन लाख शेतकऱ्यांना सरकारकडून सात हजार 309 कोटी 36 लाख 65 हजारांची मदत वितरीत केली आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या नियोजनानुसार सर्व तहसिलदारांनी मार्चएण्डपूर्वी मदतीची रक्‍कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वितरीत करणे बंधनकारक आहे. 
- सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनवर्सन, मुंबई 

हेही नक्‍की वाचा : वाहनचालकांसाठी ! बीएस- फोर वाहनांची नोंदणी बंद 

विभागनिहाय वितरीत झालेली मदत 
विभाग        मिळालेली रक्‍कम 
कोकण       131 कोटी 30 लाख 98 हजार 
नाशिक       1,825 कोटी 22 लाख 48 हजार 
पुणे            483 कोटी 39 लाख 64 हजार 
औरंगाबाद   3,100 कोटी 61 लाख 35 हजार 
अमरावती    1,615 कोटी 95 लाख 56 हजार 
नागपूर       152 कोटी 86 लाख 64 हजार 
एकूण         7,309 कोटी 36 लाख 65 हजार  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers away from timely help There is no allocation of nine hundred crores