मांगी कालवा दुरुस्त करून सांडव्यातून वाहून जाणारे पाणी सोडा कॅनॉलद्वारे : शेतकऱ्यांची मागणी 

नानासाहेब पठाडे 
Saturday, 24 October 2020

रब्बी हंगाम सुरू झाला आहे. मांगी (तालुका करमाळा) तलावही शंभर टक्के भरला आहे. मात्र तलावाखालील डावा व उजवा कालवा नादुरुस्त अवस्थेत असून, कालव्यामध्ये काटेरी झाडे व मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. पाटबंधारे विभागाने नादुरुस्त कॅनॉल तातडीने दुरुस्त करून सांडव्यातून वाहून जाणारे पाणी कॅनॉलद्वारे सोडावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. 

पोथरे (सोलापूर) : रब्बी हंगाम सुरू झाला आहे. मांगी (तालुका करमाळा) तलावही शंभर टक्के भरला आहे. मात्र तलावाखालील डावा व उजवा कालवा नादुरुस्त अवस्थेत असून, कालव्यामध्ये काटेरी झाडे व मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. पाटबंधारे विभागाने नादुरुस्त कॅनॉल तातडीने दुरुस्त करून सांडव्यातून वाहून जाणारे पाणी कॅनॉलद्वारे सोडावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. 

गेल्या तीन वर्षांपासून तलाव निरंक असल्याने कॅनॉलद्वारे पाणी सुटले नाही. त्यामुळे कॅनॉलमध्ये काटेरी व कडुनिंबाची झाडे वाढली आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याने कॅनॉल पूर्ण झाकला गेला आहे. कॅनॉलच्या उपचाऱ्याही अनेक ठिकाणी बुजल्या असून, त्याही खोदणे आवश्‍यक झाले आहे. 

यंदाच्या पावसाळ्यात अपेक्षेपेक्षाही जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे तलावात मुबलक प्रमाणात पाणी आले आहे. मात्र सध्या तलावाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रब्बी हंगाम सुरू झाल्याने कॅनॉल तातडीने दुरुस्त करून सांडव्यातून वाहून जाणारे पाणी कॅनॉलद्वारे सोडावे. अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. या महत्त्वाच्या बाबीकडे आमदार संजय शिंदे यांनी लक्ष घालून कालव्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणीही शेतकरी करीत आहेत. 

कालव्याची माहिती 
डावा कालवा आठ किलोमीटर व उजवा कालवा 27 किलोमीटर लांबीचा आहे. आठ पाणी वापर संस्था आहेत. कॅनॉलद्वारे अकरा गावांतील शेतकरी व नागरिक पाण्याचा लाभ घेतात. या कालव्यांमुळे दोन हजार 500 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येते. 

राजकारण व श्रेयवादामुळे हंगामांत कधी पाणी सुटलेच नाही 
आतापर्यंत जेवढ्या वेळेस मांगी तलावाच्या कालव्याद्वारे पाणी सुटले तेव्हा पाणी सोडण्यासाठी अनेक वेळा राजकारण घुसले. त्यामुळे रब्बी अथवा उन्हाळी हंगाम असो, हंगामाच्या सुरवातीपासून पाणी कधी सुटलेच नाही. ज्या वेळेस पाण्याची गरज निर्माण होते व शेतकरी पाण्याची मागणी करतात, त्या वेळेस पाटबंधारे विभागाकडून पाणी वापर संस्थांना वसुलीची नोटीस दिली जाते व त्यानंतर एक महिन्याचा कालावधी असाच बाकी गोळा करण्यात व कागदोपत्री रंगतो. शेवटी नाइलाजास्तव शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागते. यामध्ये अनेकांचा हस्तक्षेप होतो व श्रेयवादाचे राजकारण सुरू होते. त्यामुळे हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांनंतर शेतीला पाणी मिळते. या वर्षी तसे न होता हंगामाच्या सुरवातीपासूनच पाणी सुटावे. रोटेशन व नियमाप्रमाणे सर्वांना वेळेत पाणी मिळावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. 

पोथरे येथील शेतकरी बाबूराव आढाव म्हणाले, वेळेत पाणी सुटले तर ऊस लागवड करता येईल. यासाठी आमदार संजय शिंदे यांनी लक्ष घालावे व पाटबंधारे विभागाने तातडीने कॅनॉल दुरुस्त पाणी सोडावे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The farmers have demanded immediate repair of the Mangi canal