वर्ष उलटले तरी "या' बॅंकेत भरलेला खरीप विमा मिळालाच नाही ! शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात 

dcc
dcc
Updated on

सलगर बुद्रूक (सोलापूर) : जून-जुलै 2019 मध्ये खरिपाचा हवामान आधारित फळपीक विमा शेतकऱ्यांनी भरला होता. पण ज्या शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या खात्यावर विमा रक्कम जमा व्हावी म्हणून फॉर्म भरला होता, त्या शेतकऱ्यांच्या विम्याचे पैसे अजूनही खात्यावर जमा झाले नाहीत. त्यामुळे सलगर बुद्रूक परिसरातील शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक सोडून इतर राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला होता, त्या शेतकऱ्यांच्या विम्याचे पैसे मार्च-एप्रिलमध्ये जमा झाले आहेत. पण सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमध्ये विमा भरलेल्या शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. हा विमा मंजूर झाल्यानंतर इतर बॅंकांबरोबर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील शेतकऱ्यांच्या खात्यावरही विमा कंपनीकडून थेट पैसे जमा करण्यात आले होते. पण मध्यंतरी येस बॅंकेमध्ये घोटाळा झाल्यामुळे व सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या खातेधारकांना येस बॅंकेच्या आरटीजीएस प्रणालीद्वारे पैसे जमा होत असल्यामुळे ते पैसे जमा झाले नाहीत. पण सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची आरटीजीएस प्रणाली परत सुरू होऊन तीन महिने उलटले तरीही विमा कंपनीकडून या विमाधारकांना का विमा दिला जात नाही, असा सवाल शेतकरी करत आहेत. 

डाळिंब बागांची कामे अडली 
गेल्या वर्षी डाळिंबाला दर व्यवस्थित मिळाला नाही. त्यातच खराब हवामानामुळे डाळिंबावर वेगवेगळ्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन कमी निघाले. अशातच शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडून मदत मिळेल, या आशेने विमा भरला. पण विमा मंजूर होऊनही ते पैसे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मिळत नसल्यामुळे चालू वर्षीची डाळिंबाची सर्व कामे अडली आहेत. 

याबाबत सलगर बुद्रूकचे विमाधारक शेतकरी पांडुरंग कांबळे म्हणाले, मी व माझ्या गावातील शेतकऱ्यांनी जून 2019 मध्ये हवामान आधारित फळपीक विमा भरला होता. हा विमा मंजूर झाला पण विमा रक्कम आजतागायत आम्हाला मिळाली नाही. इतर बॅंकेत विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विमा मिळाला पण आम्हाला विमा मिळाला नाही. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com