दरमहा 50 हजारांचा हप्ता दे म्हणून किराणा दुकानदाराला जिवे मारण्याची धमकी 

तात्या लांडगे 
Saturday, 31 October 2020

किराणा दुकान चालू ठेवायचे असल्यास दरमहा 50 हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी दिल्याप्रकरणी अक्षय कदम, गणेश शिंदे, महेश शिंदे, राहुल शिंदे यांच्याविरुद्ध जोडभावी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

सोलापूर : किराणा दुकान चालू ठेवायचे असल्यास दरमहा 50 हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी दिल्याप्रकरणी अक्षय कदम, गणेश शिंदे, महेश शिंदे, राहुल शिंदे यांच्याविरुद्ध जोडभावी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

कुंभार वेस परिसरातील भास्कर ट्रेडर्सचे मालक शंकर देविदास गव्हाणे (रा. मराठा वस्ती, भवानी पेठ) यांनी पोलिसांत धाव घेतली. संशयित आरोपी राहुल शिंदे याने शंकर गव्हाणे यांना, तुला सांगितलेले समजत नाही का, दुकान चालू ठेवण्यासाठी महिन्याला पन्नास हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, उद्या पैसे तयार ठेव, नाहीतर तुला व तुझ्या मुलाला खल्लास करतो म्हणून धमकी दिली. तर महेश व राहुलने घरासमोर येऊन मला व भावाला शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली, असेही फिर्यादीत नमूद आहे. घटनेचा पुढील तपास श्री. मांजरे करीत आहेत. 

बस अडवून शासकीय कामात अडथळा 
कर्नाटक एसटीसमोर दुचाकी आडवी लावून, मी आरटीओ अधिकारी आहे, असे सांगत दमदाटी करणाऱ्या तरुणावर विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सय्यद ख्वाजाआमीन सौदागर (रा. कोल्हार, ता. बसवंन बागेवाडी, कर्नाटक) यांच्या फिर्यादीनुसार जुळे सोलापुरातील गोविंदश्री चौक येथून शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास बस घेऊन जात असताना अक्षयकुमार लक्ष्मण साठे (रा. म्हाडा कॉलनी, वामन नगर) याने दमदाटी केली. त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

बेशिस्त वाहनचालकांना 11 लाख रुपयांचा दंड 
शहरातील कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून वाहनचालकांना विनाकारण घराबाहेर पडू नका, वाहनांची कागदपत्रे जवळ ठेवा, असे आवाहन पोलिस आयुक्‍तालयाकडून करण्यात आले आहे. तरीही नियमांचे उल्लंघन करीत रस्त्यांवर फिरणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तर विनामास्क फिरणाऱ्यांनाही दंड केला जात आहे. 17 ऑगस्टपासून वाहतूक पोलिसांनी सात पोलिस ठाण्याअंतर्गत बेशिस्त वाहनचालकांकडून तब्बल अकरा लाखांचा दंड वसूल केला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filed a case against those who demanded an installment of Rs fifty thousand per month