साठेआठशे रूपयाच्या कारणावरून खून; पाच जणांना जन्मठेप 

साठेआठशे रूपयाच्या कारणावरून खून; पाच जणांना जन्मठेप 

सोलापूर : शेतातील वीजेचा खांब उभा करण्याच्या कारणावरून वाद होवून साडेआठशे रूपये मागितल्यामुळे गणेश मारूती ढोणे (वय 37, रा. औंढी, ता. मोहोळ) यांचा कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणी पाच जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.पी. आव्हाड यांनी मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

विष्णू अंकुश सुळ (वय 25), पांडुरंग अंकुश सुळ (वय 27), सुभाष ज्ञानोबा सोलनकर (वय 46), अर्जून पांडुरंग मदुणे (वय 44) आणि संजय शामराव मदने (वय 30, रा. कोताळे ता. मोहोळ) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

14 जून 2016 रोजी औंढी येथील अनिल ढोणे यांच्या शेतातील वीजेचा खांब वाऱ्याने पडला होता. त्या वीजेच्या खांबावर आरोपी पांडुरंग सूळ यानेही जोडणी घेतली होती. खांब उभा करण्याकरिता अनिल ढोणे आणि विष्णू सुळ यांनी निम्मा - निम्मा खर्च करण्याचे ठरले होते. रविद्र भुसे, दामाजी शिंदे (रा. दोघे औंढी) यांच्याकडून वीजेचा खांब उभा करून घेतला. त्यांची मजूरी 1700 रुपये रूपये ढोणे यांनी दिले. त्यापैकी साडेआठशे रूपये विष्णू सूळ याच्याकडून येणेबाकी होते. ही रक्कम घेण्यासाठी अनिल ढोणे व गणेश ढोणे हे दोघे 18 जून रोजी सुळ याच्याकडे गेले होते. पैशांची मागणी केल्यानंतर घरातून पैसे आणतो, असे सांगून विष्णू सूळ, पांडूरंग सूळ, सुभाष सोलनकर, संजय मदने, अर्जून मदने यांनी घरातून कोयता, लाकडी काठी आणली. तुझा पैसे मागायचा काय संबंध असे म्हणत कोयत्याने गणेश ढोणे यांच्या डोक्‍यात वार केला. इतरांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत जखमी होऊन गणेश यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सुनावणीवेळी 9 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी, पुरावा तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राहय धरून न्यायालयाने पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा तसेच प्रत्येकी दोन हजार रूपये दंड तसेच दंड नाही भरल्यास पंधरा दिवस सक्त मजूरीची शिक्षा सुनावली. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, मूळ फिर्यादीतर्फे ऍड. जयदीप माने यांनी तर आरोपी पक्षातर्फे ऍड. पी.बी. शेंडे, ऍड. व्ही.डी. फताटे यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com