मध्यरात्रीच्या अंधारात पुराचे पाणी गावात शिरल्याने ग्रामस्थ घरदार सोडून उघड्यावर 

दिनेश माने-देशमुख
Saturday, 19 September 2020

मागील काही दिवसांपासून सलग पावसाची रिपरिप चालू असताना काल माळशिरस तालुक्‍यात अतिवृष्टी होऊन सर्व मंडळामध्ये एकूण 915 मिमी पाऊस झाला आहे. यापैकी नंदाच्या ओढ्याचे उगम स्थान असलेल्या पिलीव मंडलमध्ये ढगफुटीजन्य पाऊस होऊन सर्वाधिक 221 मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली. अगोदर झालेल्या पावसामुळे या परिसरातील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, पाझर तलाव तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाले होते. 

बोंडले(सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तोंडले-बोंडले येथील नंदाच्या ओढ्याला आलेल्या पुराने मध्यरात्रीच्या सुमारास गावात पाणी शिरल्याने ग्रामस्थांनी घरादार सोडून जनावरांना घेऊन बाहेर पडल्याची घटना घडली. शेतातील पिके व अनेक घरातील साहित्य वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. 

हेही वाचाः अक्कलकोटच्या भाजी मंडीत मास्क न वापरण्याची बेशिस्त ः पोलिसांचे पालिकेला पत्र 

मागील काही दिवसांपासून सलग पावसाची रिपरिप चालू असताना काल माळशिरस तालुक्‍यात अतिवृष्टी होऊन सर्व मंडळामध्ये एकूण 915 मिमी पाऊस झाला आहे. यापैकी नंदाच्या ओढ्याचे उगम स्थान असलेल्या पिलीव मंडलमध्ये ढगफुटीजन्य पाऊस होऊन सर्वाधिक 221 मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली. अगोदर झालेल्या पावसामुळे या परिसरातील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, पाझर तलाव तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाले होते. 

हेही वाचाः शहरात 24 नंबर प्रभागात सर्वाधिक रुग्ण ! आज 68 पॉझिटिव्ह अन दोघांचा मृत्यू 

यातच काल पिलीव मंडळामध्ये झालेल्या ढगफुटीजन्य पावसाचे वाहून येणारे पाणी पुढे नंदाच्या ओढ्यात मिसळत असल्याने तोंडले बोंडले येथे पूरस्थिती निर्माण झाली. रात्री साडेदहा वाजता पात्रातून वाहणारे पुराचे पाणी रात्री दिड वाजेपर्यंत पात्राबाहेर पडून दोन्ही गावच्या निम्म्या गावठाणात शिरले होते. क्षणाक्षणाला पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने ग्रामस्थांवर वेळेअभावी, सामानासह घरदार सोडून स्वतःला आणि जनावरांना घेऊन बाहेर पडावे लागले. सुदैवाने बोंडले येथील विजयकुमार देशमुख यांच्या जनसंपर्कामुळे व पुरस्थितीचा अंदाज आल्याने नागरिकांना सुखरूप ठिकाणी जाण्यात यश आले. यामध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नाही. 
परंतु, नंदाच्या ओढ्याला आलेल्या पुरातील पाण्याच्या प्रवाहाच्या प्रचंड वेगामुळे, ओढ्यालगत असलेल्या शेतजमीनीतील केळी, ऊस, डाळिंब, मका अशा पिकांसह शेतातील माती, सूक्ष्म सिंचनाच्या वस्तू, कच्च्या घरांसह घरातील संसारोपयोगी साहित्य, व्यावसायीकांचे तात्पुरत्या स्वरूपाचे पत्रा शेड व त्यातील साहित्य वाहून गेले आहे. वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीचे खांब व रोहित्र जागीच कोसळले आहेत. 
तसेच ओढ्यावरील असलेल्या पुलाचे साईड गार्ड तुटले असून तोंडले कडील भराव खचला आहे. यामुळे तोंडले आणि बोंडले या दोन्ही गावचा जवळचा मार्ग बंद झाला आहे. ओढ्यातील पुराच्या पाण्याने ह.भ.प.बाळू पाटील महाराज यांच्या समाधीचे कलशासह असणारे छत्र पडले आहे. अशाप्रकारे पुरस्थिती परिस्थितीमुळे येथील शेतकरी, रहिवासी, व्यवसायिकांचे आर्थिकदृष्ट्या अतोनात नुकसान झाले आहे. सदर घटनेची जिल्हा परिषद सदस्या स्वरूपाराणी मोहिते पाटील यांचेकडून सकाळी पाहणी करण्यात आली. नुकसान भरपाईसाठी प्रशासनाने तात्काळ पाहणी करून पंचणामे करावेत अशा सुचना केल्याचे त्यांनी सांगितले.  
 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The floodwaters inundated the village in the middle of the night and the villagers left the house open