"या' माजी आमदाराने दिला इशारा : पुन्हा लॉकडाउन लादाल तर खबरदार..!

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 7 जुलै 2020

आता कुठे रोजगार सुरू झाला की नाही लगेच प्रशासनाने लॉकडाउन लादलं तर ते सहन केले जाणार नाही. सोलापूरचे औद्योगिक वातावरण बिघडून लोक रस्त्यावर उतरतील. लॉकडाउन मोडून काढू. तेव्हा लॉकडाउन लादाल तर खबरदार, असा इशारा मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव, ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिला आहे. 

सोलापूर : आज सोलापूर शहरात पुन्हा प्रशासनाकडून लॉकडाउनची मागणी होत असून, मात्र आता सोलापूर शहराला लॉकडाउन परवडणारे नाही. याला मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा तीव्र विरोध आहे, अशी भूमिका मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव, ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम यांनी मांडली. 

हेही वाचा : 80 वर्षाच्या शेतकरी आजोबाची पत्नीसह दुबार पेरणी, डोळ्यात टचकन पाणी आणणारा व्हिडीओ 

लॉकडाउन शिथिलीकरणामुळे सोलापुरातील उद्योजक व कामगारांना मोठा दिलासा मिळाला असून, यासाठी रस्त्यावरची लढाई केली. गेल्या महिन्यापासून उद्योग-व्यवसाय 50 टक्के रुळावर आले आहेत. 65 हजार महिला विडी कामगारांची रोजीरोटी सुरू झाल्याने त्यांची उपासमारी थांबली आहे. आता कुठे रोजगार सुरू झाला की नाही लगेच प्रशासनाने लॉकडाउन लादलं तर ते सहन केले जाणार नाही. सोलापूरचे औद्योगिक वातावरण बिघडून लोक रस्त्यावर उतरतील. लॉकडाउन मोडून काढू. तेव्हा लॉकडाउन लादाल तर खबरदार, असा इशाराही श्री. आडम यांनी प्रशासनाला दिला आहे. 

हेही वाचा : शहराचे माजी महापौर म्हणतात : कोरोनामुळे नव्हे तर उपासमारीने मरण येणे सर्वांत वाईट! 

कोरोनाला अटकाव करण्याकरिता जी काही शिस्त पाळावी लागते, जी नियमावली आपल्याला घालून दिलेली आहेत त्या नियमावलींची अंमलबजावणी बिलकूल होत नाही. 25 हजार जणांना पोलिसांकडून लॉकडाउनमध्ये संचार करण्यासाठी पासेस मिळत असतील तर कोरोनाचा अटकाव कसा होणार, असा सवाल श्री. आडम यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, लॉकडाउनऐवजी नियम अजून कडक करा, शिस्त लावा, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने योग्य उपाययोजना करा. श्रमिकांना, व्यापाऱ्यांना, कारखानदारांना हे लॉकडाउन झेपणारे नाही. कामगार जगला पाहिजे, रोजगार वाचला पाहिजे याबाबत सरकार आणि प्रशासनाने आखणी करावी. 

सोलापुरात विडी, यंत्रमाग, असंघटित कामगार, रिक्षा चालक - मालक असे अनेक कामगार काम करतात. यातील बहुतांश लोक हे झोपडपट्टी भागात राहतात. संपूर्ण टाळेबंदीच्या काळात उपाशी, अर्धपोटी जेवण करून त्यांनी दिवस काढले. हाताला काम नाही, कर्ज, उसनवारी, बचत गटांचा तगादा, खासगी सावकार आणि दुकानांची उधारी या सर्व गोष्टी पूर्वपदावर येण्यासाठी आणखी किमान एक वर्ष लागेल. आता कुठे बाजारपेठ, कारखाने, उद्योग आठवड्यातून तीन दिवस सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाउन करून कोरोना आटोक्‍यात येईल का? आधी लोकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून द्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA Narasaya Adam opposes lockdown in Solapur