यंदाच्या गणेशोत्सवात बॅंड, ढोलवादनाचा दणदणाट नाही; मात्र कलाकारांची होतेय उपासमार

प्रकाश सनपूरकर 
Thursday, 13 August 2020

गणेशोत्सव तोंडावर आला आहे, तेव्हा मिरवणूक निघणार नाहीत असा निर्णय झाला. मात्र गणपती स्थापना व आरती होणार आहेत. तसेच काही सामाजिक कार्यक्रम देखील मंडळांकडून सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून होणार आहेत. तेव्हा या कलावंतांना लग्न सोहळ्याप्रमाणे वादनाचे काम मिळावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. पण अद्याप तरी एकाही गणेश मंडळाकडून बॅंड व ढोल पथकाच्या ऑर्डर बुक झालेल्या नाहीत. त्यामुळे गणेशोत्सवात काम मिळाले नाही तर करायचे काय, असा प्रश्‍न या कलावंतांसमोर उभा राहिला आहे. 

सोलापूर : यावर्षी कोरोनामुळे गणेशोत्सवाच्या ऑर्डरी नसल्याने बॅंड व ढोलीबाजा पथकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शहरातील पाच हजार कलावंतांचा रोजीरोटीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. दरवर्षी दोन महिने आधीपासून ऑर्डर मिळवणाऱ्या या कलावंतांसमोर सीझनचा काळ असणाऱ्या गणेशोत्सवात मात्र बेकारीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

हेही वाचा : ब्रेकिंग! अहिल्यादेवींच्या अध्यासन केंद्राचा प्रस्ताव विद्यापीठातच धूळखात पडून 

शहरामध्ये बॅंजो, बॅंड, सनई-चौघडा, ढोलीबाजा व हलगी वादनाचा व्यवसाय करणाऱ्या कलावंतांचे मागील काही महिन्यांपासून कोरोना संकटामुळे हाल सुरू आहेत. लॉकडाउनमध्ये सर्वांत मोठा लग्नसराईचा सीझन गेला. उन्हाळ्यात लग्नसराईची कामे मिळाली नाहीत. मात्र शासनाने लग्नासाठी सहा लोकांच्या पथकांना बॅंडची परवानगी दिली होती; पण मोठ्या प्रमाणात लग्न झालेच नाहीत. तसेच जे काही विवाह झाले ते घरगुती पद्धतीने झाले. त्यामुळे या कलावंतांना कामाविना घरीच बसावे लागले. 

हेही वाचा : सरकारचे "यूजीसी'कडे बोट ! "एटीकेटी' विद्यार्थ्यांसमोर नवा पेच 

मंदिरे बंद झाल्याने जत्रा-यात्रा व इतर धार्मिक कार्यक्रम देखील बंद होते. या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सनई वादनापासून अनेक प्रकारच्या वादनाचे प्रकार वापरले जातात. पण त्याचेही उत्पन्न बंद झाले. अशा परिस्थितीत या कलावंतांनी वादनाचे काम नसल्याने हमाली व मोलमजुरी करून घर चालवण्यासाठी आटोकाट प्रयत्न चालवले आहेत. आता गणेशोत्सव तोंडावर आला आहे, तेव्हा मिरवणूक निघणार नाहीत असा निर्णय झाला. मात्र गणपती स्थापना व आरती होणार आहेत. तसेच काही सामाजिक कार्यक्रम देखील मंडळांकडून सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून होणार आहेत. तेव्हा या कलावंतांना लग्न सोहळ्याप्रमाणे वादनाचे काम मिळावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. पण अद्याप तरी एकाही गणेश मंडळाकडून बॅंड व ढोल पथकाच्या ऑर्डर बुक झालेल्या नाहीत. त्यामुळे गणेशोत्सवात काम मिळाले नाही तर करायचे काय, असा प्रश्‍न या कलावंतांसमोर उभा राहिला आहे. 

ठळक... 

  • शहरातील बॅंड व बॅंजो पथके ः 55 
  • वादन कलावंत ः 5000 

याबाबत कलाकार मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कालिदास दिलपाक म्हणाले, गणेशोत्सवात वादनाचे काम मिळावे यासाठी आम्ही पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार प्रणिती शिंदे आदींकडे मागणी केली आहे. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून हे सर्व करता येणार आहे. या कलावंतांचा रोजीरोटीचा प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रशासन व गणेश मंडळांनी सहकार्य केले तर रोजगार मिळू शकेल. 

बॅंड पथक कलावंत सनी दणाणे म्हणाले, काम नसल्याने वादक जमेल तेथे जाऊन मोलमजुरी, भाजीपाला विक्री अशी कामे करत आहेत. प्रशासनाने अनेक कारागिरांना परवानगी दिली तशी वाजंत्री वादकांना सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून गणेश मंडळांनी दिली तर कामे मिळू शकतील. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav will be held in a simple manner so the band and drummers artist are starving