सोलापूरला गुडन्यूज : प्रयोगशाळेला मिळणार 50 लाखांची यंत्रसामग्री 

प्रमोद बोडके
Thursday, 19 March 2020

ही असणार नऊ उपकरणे 
प्रशासकीय मान्यता मिळालेल्या 50 लाख 35 हजार 540 रुपयांच्या निधीतून नऊ प्रकारची यंत्रसामग्री खरेदी केली जाणार आहे. बायोसेफ्टी कॅबिनेट, रेफ्रिजरेटेड हायस्पीड सेंट्रिफ्यूज, थर्मल सायकलर, जेल डॉक्‍युमेंटेशन सिस्टिम अँड जेल इलेक्‍ट्रोफोरेसिस, रेफ्रिजरेटेड मायक्रोफ्यूज, रिअल टाइम पीसीआर मशिन, 80 अंशाचा व्हर्टिकल अल्ट्रा लो फ्रिझर, ऑटोमेटेड मायक्रो प्लेट वॉशर, ऑटोमेटेड मायक्रो प्लेट रीडर अशी नऊ यंत्रसामग्री खरेदी या निधीतून केली जाणार आहे. 

सोलापूर : सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात साकारणाऱ्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत 50 लाख 35 हजार रुपयांची यंत्रसामग्री खरेदी करण्यास आज वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. कोरोनासह इतर विषाणूजन्य आजारांची चाचणी करण्यासाठी ही प्रयोगशाळा उपयुक्त ठरणार आहे. या प्रयोगशाळेचा लाभ सोलापूरसह मराठवाड्यातील शेजारचे जिल्हे, कर्नाटकातील शेजारील जिल्ह्यांना होणार आहे. 
हेही वाचा - मोठी बातमी : कोरोनाबाबत एसटी महामंडळाने घेतला हा निर्णय 
भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या अनुदानातून ही प्रयोगशाळा होणार आहे. केंद्र व राज्य योजनेअंतर्गत या प्रयोगशाळेसाठी निधी दिला जाणार आहे. खरेदी केली जाणारी यंत्रसामग्री हाताळण्यासाठी नव्याने पदनिर्मितीची, बांधकामाची व विद्युतीकरणाची आवश्‍यकता नसल्याबाबत संचालनालयाने व महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांनी खातरजमा करण्याची सूचनाही शासनाने केली आहे. ही यंत्रसामग्री खरेदीविषयक प्रक्रिया हाफकिन बायो-फार्मासुटिकल्स कार्पोरेशन यांच्याकडून केली जाणार आहे. यंत्रसामग्रीची खरेदी/पुरवठा करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचीही सूचना करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good News to Solapur: Laboratory will get 50 lakhs of machinery