'मतदान संपलं, राजकारण संपलं; कोणीही निवडून येऊ पण मतभेद विसरून गावचा विकास साधू !'

नाना पठाडे 
Sunday, 17 January 2021

पोथरे तालुका करमाळा येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक तीन मध्ये खूप अटीतटीची निवडणूक झाली. या निवडणुकीत संतोष पोपट ठोंबरे व शरद बाळू शिंदे हे एकमेकांचे स्पर्धक होते.

पोथरे (सोलापूर) : मतदान संपलं, राजकारण संपलं. भविष्यकाळामध्ये कोणीही निवडून येऊ, आपण मात्र मतभेद विसरून गावच्या विकासासाठी एकत्र राहू. अशा प्रकारचा संदेश पोथरे येथील प्रभाग क्रमांक तीन मधील परस्पर विरोधी उभे राहिलेले संतोष ठोंबरे व शरद शिंदे यांनी एकत्रित येऊन दिला आहे. एवढेच नाही तर विरोधी गटातून उभे राहिलेले संतोष ठोंबरे यांच्या घरी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांसह जाऊन गळाभेट व हस्तांदोलन करत कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कुणीही मतभेद व द्वेष करू नये असे आवाहन केले. त्यामुळे याच गावात व तालुक्‍यात जोरदार चर्चा होत असून त्यांनी सुरू केलेला पायडा इतरांना अनुकरणीय ठरला आहे. 

सोलापूरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पोथरे तालुका करमाळा येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक तीन मध्ये खूप अटीतटीची निवडणूक झाली. या निवडणुकीत संतोष पोपट ठोंबरे व शरद बाळू शिंदे हे एकमेकांचे स्पर्धक होते. मतदान कालावधीत दोघांनीही आपापला शांततेत प्रचार केला व मतदानही शांततेत पार पडले. सायंकाळी साडे पाच वाजता मतदान संपल्यानंतर मतदान केंद्रा शेजारीच आपल्या स्पर्धक यांची संतोष ठोंबरे यांचे घर असल्याने ठोंबरे यांचे स्पर्धक शरद शिंदे हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह ठोंबरे यांच्या घरी गेले. घरी जाऊन ठोंबरे यांना गळाभेट घेऊन हस्तांदोलन केले तर ठोंबरे यांनी शरद शिंदे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत त्यांना चहा पाण्याचा कार्यक्रम केला. व दोघांनीही एकमेकांच्या हातात हात घेऊन मतदान संपलं राजकारण संपलं कोणीही निवडून येऊ आपण मात्र एकत्र राहू. 

हे ही वाचा : करमाळ्यात विजयावर पैजा ! कोणता गट किती पाण्यात, यावरच मतदानापासून खुमासदार चर्चा

पूर्वीचे कुरघोडीचे राजकारण बंद करू व विकासाच्या राजकारणाकडे आपण लक्ष देऊ. एवढेच नाहीतर ठोंबरे व शिंदे यांनी उभा राहून कार्यकर्त्यांनाही द्वेष मत्सर न करता एकत्रित राहण्याचे आवाहन केले. या बैठकीनंतर गावात, तालुक्‍यात याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली असून यांनी सुरू केलेला हा पायंडा सर्वांना अनुकरणीय आहे. राजकारणात पुरत राजकारण करून एकत्रित राहण्याची हीच प्रथा आता समाजाला व लोकशाहीला जिवंत ठेवणारी ठरणार आहे. जुने राजकारण बंद करून शरद शिंदे व संतोष ठोंबरे यांनी नवीन सुरू केलेला पांयडा हा खूपच चांगला असून इतरांना तो अनुकरणीय आहे. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

हे ही वाचा : बार्शीतील अपक्षांसह अधिकृत उमेदवारांच्या भवितव्याकडे ग्रामस्थांच्या नजरा

यावेळी बाजीराव शिंदे म्हणाले की, निवडणूक काळात एकमेकाविषयी निर्माण झालेले मतभेद हे संतोष ठोंबरे व शरद शिंदे यांनी एकत्रित येऊन ते दूर केले आहेत. त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम सर्व उमेदवारांनी राबवला तर राजकारण कालावधीत होणारे वादाला प्रतिबंध लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the Gram Panchayat elections held at Pothare taluka Karmala a very close election has taken place in ward number three