करमाळ्यात विजयावर पैजा ! कोणता गट किती पाण्यात, यावरच मतदानापासून खुमासदार चर्चा

अण्णा काळे 
Sunday, 17 January 2021

देवळाली ग्रामपंचायतीवर माजी आमदार नारायण पाटील यांची सत्ता असून करमाळा पंचायत समितीचे विद्यमान सभापती गहिनीनाथ ननवरे यांच्या नेतृत्त्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली.

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पोथरे, देवळाली, जातेगाव, झरे, सावडी, साडे, कुंभेज, उमरड या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीत अंत्यत चुरस दिसून आली. तालुक्‍यातील महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात कोण बाजी मारणार, याची उत्सुकता तालुक्‍याला लागली आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून तालुक्‍यात कोणता गट किती पाण्यात आहे, हे लक्षात येऊ शकते.  

सोलापूरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

देवळाली ग्रामपंचायतीवर माजी आमदार नारायण पाटील यांची सत्ता असून करमाळा पंचायत समितीचे विद्यमान सभापती गहिनीनाथ ननवरे यांच्या नेतृत्त्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली. गेली पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर आपण ही निवडणूक सहज जिंकू, असा आत्मविश्वास सभापती गहिनीनाथ ननवरे यांना आहे. तर त्यांच्या विरोधात बागल गटाकडून पंचायत समितीचे माजी उपसभापती कल्याणराव गायकवाड यांचे चिरंजीव आशिष गायकवाड यांनी पुढाकार घेऊन पॅनेल उभा केला. देवळाली ग्रामपंचायतीवर अनेक वर्षांपासून गायकवाड यांची सत्ता होती. मात्र गेली पंचवार्षिक निवडणुकीपासून त्यांची सत्ता गेली आहे. ही सत्ता परत आपण आणू, असा दावा गायकवाड यांच्याकडून केला जात आहे. देवळाली ग्रामपंचायत निवडणूक अतिशय चुरशीची झाली आहे. निवडणूक जरी चुरशीची झाली असली तरी दोन्ही गटांकडून खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडली गेली. गायकवाड यांना सत्ता मिळण्याच्या अपेक्षा आहेत. 

हे ही वाचा : मंगळवेढ्यातील सत्तासंघर्षात निवडणुकीला गालबोट ! पराभवाची संक्रांत कोणावर व विजयाची माळ कोणाच्या गळ्यात?
 
देवळाली ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार शिवशरण पाटील गटविरूध्द बागल गट असा थेट सामना पाहायला मिळाला. झरे ग्रामपंचायतीवर पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास पाटील यांची झरे ग्रामपंचायतीवर अनेक वर्षांपासून सत्ता आहे. सध्या विलास पाटील, नारायण पाटील यांच्याबरोबर काम करत आहेत. युवा नेते प्रशांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली ही निवडणूक लढवली गेली. गावातील दिग्गज मंडळींनी एकत्र येऊन युवा नेते प्रशांत पाटील यांच्याविरोधात तगडा आव्हान दिल्याने वयाच्या नव्वदाव्या वर्षीदेखील विलास पाटील यांनी प्रचारात भाग घेतला, तर पाटील यांच्याविरोधात उद्योगपती नारायण अमृळे, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब गुळवे यांनी एकत्र येत पाटील यांची सत्ता घालवण्यासाठी पाटील यांची सत्ता घालवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पाटील विरोधी गटाला यावेळी सत्ता परिवर्तन होईल, अशी अपेक्षा वाटते. 

हे ही वाचा : सत्तांतरासाठी कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला ! विकासाच्या मुद्याऐवजी राजकीय धुळवडीचेच अधिक दर्शन

जरी ग्रामपंचायत निवडणुकीत पाटील यांची सत्ता राहणार की जाणार, हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पश्‍चिम भागातील सावडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक काशिनाथ काकडे व माजी आमदार नारायण पाटील गटाचे विद्यमान उपसरपंच महादेव श्रीखंडे यांनी एकत्र येत मागील पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणेच याही वर्षी उमेदवार उभे केले आहेत, तर आमदार संजय शिंदे समर्थक सतिश शेळके यांनी तोडीस तोड उमेदवार दिले आहेत. आपलीच सत्ता राहिल, असे काशिनाथ काकडे, महादेव श्रीखंडे यांचा दावा आहे, तर यावेळी कोणत्याही परिस्थितीत सत्ता परिवर्तन घडवून आणणार, असा दावा सतीश  शळके यांच्या वतीने केला जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जातेगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या माध्यमातून बगल गटाची गेली दहा वर्षांपासून सत्ता आहे. मात्र विधानसभा निवडणुकीपासून संतोष वारे हे बागल गटापासून वेगळे झाले असून जातेगाव ग्रामपंचायतीची संतोष वारे यांची सत्ता घालवण्यासाठी शिंदे गट, जगताप गट, बागल गट, पाटील गट एकत्र येऊन एक सक्षम पॅनल त्यांच्याविरोधात दिला. त्यामुळे येथे संतोष वारे यांची सत्ता घालवण्याची संधी विरोधकांनी साधली असल्याचे मानले जात आहे. तर आपण ही निवडणूक एकाकी लढलो असलो तरीदेखील मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे आपण सत्ता राखू, असा आत्मविश्वास संतोष वारे यांना आहे. 

तालुक्‍यातील लक्ष्यवेधी लढतीची दुसरी ग्रामपंचायत म्हणजे पोथरे. पोथरे ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वर्षांपासून बागल गटाची सत्ता आहे. बागल गटाच्या बालेकिल्ल्यातील ही ग्रामपंचायत असल्याने या निवडणुकीत विरोधकांनी मोठी ताकद लावली. या ग्रामपंचायत निवडणुकीत बागल गट व पाटील गट हे एकत्र आले असून, त्यांच्याविरोधात आमदार शिंदे गट व जगताप गट अशी लढत होत आहे. पोथरे ग्रामपंचायत निवडणुकीत बागल गट व पाटील गट यांचे पारडे जड समजले जात आहे.
 
ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्‍याचे विशेष लक्ष लागले आहे. माजी राज्यमंत्री दिगंबरराव बागल यांच्यापासून या गावावर बागल गटाची एकहाती सत्ता आहे. बागल यांच्याच गावात आमदार संजयमामा शिंदे गटाने माजी आमदार नारायण पाटील गटाबरोबर मिळते-जुळते घेत उमेदवार उभे केले असून, दोन्हीही गटांकडून विजयाचे दावे करण्यात आले आहेत. माजी आमदार श्‍यामल बागल यांच्या गावात विद्यमान आमदार संजय शिंदे सत्ता काबीज करणार की बागल सत्ता राखणार, हा सध्या तालुक्‍यात चर्चेचा विषय ठरला आहे. 

गेली पाच वर्षांत देवळाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जी विकासकामे केली आहेत. त्या विकासकामांची नोंद घेत मतदारांनी आम्हाला कौल दिला आहे. गावातील विरोधकांची दहशत पाच वर्षांत पूर्णपणे कमी केल्याने निश्‍चितच आमचा विजय होईल. मतदार विकासाला मतदान करतात, हे या निवडणुकीतून सिध्द होईल. 
- गहिनीनाथ ननवरे, सभापती, पंचायत समिती, करमाळा 

देवळाली ग्रामपंचायत निवडणुकीत पाच वर्षात सत्ताधारी मंडळीकडून जो त्रास झाला. त्यामुळे यावेळी सत्ता परिवर्तन होऊन जनता आम्हाला सत्ता देईल, असा आत्मविश्वास आहे. 
- अशिष गायकवाड, देवळाली, ता. करमाळा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Karmala taluka there is curiosity as to who will win the Gram Panchayat election