अनुकरणीय ! नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये साकारली हरित शाळा 

प्रकाश सनपूरकर 
Tuesday, 1 September 2020

अनेक शाळांची मैदाने ओसाड आहेत. विद्यार्थी, शिक्षक व शाळा समिती यांचे त्याकडे लक्ष नाही. त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑक्‍सिजनची कमतरता जाणवत आहे. वर्गखोल्या विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेल्या असतात. मोकळा श्‍वास घेणेसुद्धा अवघड होते. अशा परिस्थितीवर मात करून विद्यार्थ्यांना ऑक्‍सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी वृक्षाच्छादित शाळा ही संकल्पना पुढे आली. 

सोलापूर : खचाखच भरलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांना जाणवणारी ऑक्‍सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी शाळांच्या मैदानावर सर्वाधिक ऑक्‍सिजन पुरवठा करणारे वृक्ष लावण्याची योजना नागेश करजगी ऑर्किड स्कूलने प्रत्यक्षात आणली. याबाबत वृक्षप्रेमी ग्रुपचे डॉ. यशवंत पेटकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

हेही वाचा : अकरावी प्रवेश प्रक्रिया दुसरी यादी : भारती विद्यापीठ 93.80 तर एडी जोशी 92 टक्‍क्‍यांवर क्‍लोज 

अनेक शाळांची मैदाने ओसाड आहेत. विद्यार्थी, शिक्षक व शाळा समिती यांचे त्याकडे लक्ष नाही. त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑक्‍सिजनची कमतरता जाणवत आहे. वर्गखोल्या विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेल्या असतात. मोकळा श्‍वास घेणेसुद्धा अवघड होते. अशा परिस्थितीवर मात करून विद्यार्थ्यांना ऑक्‍सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी काय करता येईल, याचा आम्ही विचार केला. त्यातून वृक्षाच्छादित शाळा ही संकल्पना पुढे आली. यावर आधारित कामाला सुरवात झाली असून, सोलापूर परिसरातील पंधरा शाळांतून प्रायोगिक तत्त्वावर या संकल्पनेचे काम सुरू असल्याचे डॉ. पेटकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

हेही वाचा : सोलापूरकरांना आजपासून भरावा लागणार नवा कर! सत्ताधाऱ्यांवर टीका करीत "यांनी' केला विरोध 

विविध शाळांचे पदाधिकारी व मुख्याध्यापकांसमोर जाऊन ही संकल्पना मांडली. सर्वाधिक ऑक्‍सिजन देणारी पिंपळ, वड अशी झाडे उपयुक्त आहेत म्हणून या झाडांच्या रोपांचा पुरवठा केला. सुरवातीला शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूलने या योजनेत सहभाग नोंदवला. आता या शाळेच्या इमारतीच्या परिसरात झालेली हिरवाई मॉडेल बनली आहे. त्यानंतर नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये सुरवातीला झाडे लावली. अगदी महिन्यातच भव्य इमारतीच्या उंचीची बरोबरी गाठणारी झाडे उभी राहिली. त्यानंतर परिसरातील शाळांनी ऑक्‍सिजन प्रयोगाला प्रतिसाद देण्यास सुरवात झाली. बाळे जिल्हा परिषद शाळा, चिंचोली काटी प्रशाला, अर्जुनसोंड प्रशाला, मुळेगाव पारधी समाज आश्रमशाळा, चंडक प्रशाला, बाळे, कामटी प्रशाला, दमाणीनगर, एसएमसी स्कूल, लिटिल फ्लॉवर स्कूल व सरस्वती मंदिर, दत्त चौक, लोकमंगल स्कूलमध्ये हा प्रयोग सुरू झाला आहे. या पंधरा शाळा येत्या काही दिवसांत हरित शाळा होतील व तेथील विद्यार्थ्यांना पुरेसा ऑक्‍सिजन पुरवठा या झाडांच्या माध्यमातून केला जाईल, ही संकल्पना रुजू लागली आहे. 

डॉ. यशवंत पेटकर म्हणाले, परिसरातील शाळांची निवड करून या शाळा हरित शाळा करण्याच्या दृष्टीने पंधरा शाळांमध्ये काम सुरू केले आहे. त्यामध्ये शाळांचे पदाधिकारी व शिक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. 

वृक्षप्रेमी ग्रुपचे डॉ. सचिन पुराणिक म्हणाले, वृक्षांच्या संदर्भात झाडांची भिसी या उपक्रमांना जोडून शाळांना या उपक्रमात सहभागी करून घेण्याचे ठरवले आहे. त्याचे परिणाम आता दिसायला लागले आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Green School developed at Nagesh Karajgi Orchid School