युवकांमध्ये वाढतेय टॅटूची क्रेझ; पण कोरोनाची भीती कायम 

अनुराग सुतकर
Friday, 5 March 2021

पूर्वी सोलापूर शहरातील नागरिक हे गड्डा यात्रा किंवा इतर गावाकडील यात्रेत गोंदन काढत असत. प्रचंड प्रमाणात त्रास सहन करून गोंदवायचे परंतु आता तंत्रज्ञानामुळे आधुनिक पद्धतीने गोंदन रेखाटणे फारच सोपे झाले आहे.

सोलापूर : "ओल्ड इज गोल्ड', ही म्हण तरुणांमध्ये सध्या फारच रूजते आहे. आजकाल टॅटू म्हणजेच गोंदन शरीरावर रेखाटण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. युवकांमध्ये वाढतेय टॅटूची क्रेझ वाढत आहे. मात्र, कोरोनाची भीती कायम आहे. याबद्दल टॅटू व्यवसायिक आम्ही सर्वतोपरी काळजी घेतोय अशा प्रतिक्रिया एकसूरात काढत आहेत. 
पूर्वी सोलापूर शहरातील नागरिक हे गड्डा यात्रा किंवा इतर गावाकडील यात्रेत गोंदन काढत असत. प्रचंड प्रमाणात त्रास सहन करून गोंदवायचे परंतु आता तंत्रज्ञानामुळे आधुनिक पद्धतीने गोंदन रेखाटणे फारच सोपे झाले आहे. काही त्रासही सहन करायची गरज नाही. मागील एका वर्षात कोरोनाचा मोठा परिणाम शहरातील टॅटू व्यवसायावर झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वी टॅटूची हौस असणारे गोवा, मुंबई, पुणे येथे जाऊन गोंदवत असत, परंतु आता तशीच क्वालिटी आणि सुबकता सोलापुरातील टॅटू कलाकार रेखाटत आहेत. ते ही अत्यल्प दरात. कोरोनाचा फटका या व्यवसायाला ही प्रचंड प्रमाणात बसल्याचे दिसून येत आहे. पूर्वीच्या तुलनेत आता टॅटूचे हौशी मंडळी पाठ फिरवत आहेत. सोलापुरातील कलाकार टॅटू या व्यवसायातून आपला प्रपंच चालवत आहेत. दिवसभरातून केवळ एक ते दोनच लोक येत असल्याने त्यांना नाहक ताण सहन करावा लागत आहे. 

ही तर कला 
टॅटू प्रामुख्याने कलेचा भाग आहे. या व्यवसायावर शहरभरातील अनेक कलाकारांची रोजीरोटी अवलंबून आहे.आधीच कोरोनामुळे या व्यवसायाला फार दुर्दशा आली असताना प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे लॉकडाऊन करु नये. शिवाय आम्ही स्वतःच कोरोना प्रतिबंध यासंबंधीची काळजी घेतोय. 

- संतोष उमाकांत नरके, टॅटू व्यावसायिक 

मास्कचा वापर  
आमच्याकडे येणाऱ्या टॅटू हौशींचा टॅटू गोंदताना थेट संबंध येतो. परंतु आम्ही पूर्वीपासूनच हॅण्डग्लोव्हज आणि मास्क घालतोच. परंतु कोरोनानंतर 50 टक्के ग्राहक कमी झाले आहेत. त्यामुळे आधिच तोट्यात चाललेला हा व्यावसाय बंद करायची वेळ येईल हे निश्‍चित. 
- मनोज टोणपे, टॅटू व्यावसायिक 

कोरोनाचा परिणाम 
कोरोना थोडासा शिथिल झाल्यावर गेली दोन ते तीन महिने ग्राहकांचा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत होता. परंतु 50 टक्के ग्राहक अजुनही तयार होत नाहीत . परंतु लॉकडाऊन उठेल असे वाटल्याने मटेरियल मोठ्या प्रमाणात आणून ठेवले होते, त्याचे ट्रान्सपोर्ट आणि कुरियर चार्जेसचा खर्चही मोठा झाला आहे. 
-विशाल बिज्जा, टॅटू व्यावसायिक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The growing craze for tattoos among young people; But Corona's fears persisted