वेलडन सोलापूर पोलिस..! कर्नाटकात घुसून उद्धवस्त केला गुटख्याच्या कारखाना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, स्वादिष्ट तंबाखू, सुगंधित सुपारीच्या विक्रीला बंदी आहे. सोलापुरात कोणत्याही भागात गुटख्याची वाहतूक होत असेल किंवा गुटखा विकला जात असेल तर नागरिकांनी 9823233781 या मोबाईल क्रमांकावर माहिती द्यावी. 
- संदीप शिंदे, 
पोलिस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, सोलापूर

सोलापूर : विषारी गुटखा बनवणाऱ्या टोळीला शहर गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. कर्नाटकातील हुमनाबाद येथे जाऊन गुटखा बनविण्याचा कारखाना उद्धवस्त करून आतील मशीन, कच्चामाल, गुटख्याची पाकिटे, वाहने असा एकूण 1 कोटी 38 लाख 37 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पाच जणांना अटक केली असून इतरांचा शोध सुरु आहे. 

हेही वाचा -  ऑर्केस्ट्रा बारमध्ये सुरू होती छमछम! अन्‌..

कौशल्याने केला तपास
गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या पथकाने 1 फेब्रुवारी 2019 रोजी जुना तुळजापूर नाका परिसरात गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली होती. त्यानंतर कौशल्याने तपास करून गुन्हे शाखेचे पथक कर्नाटकातील नंदगाव (ता. हुमनाबाद) येथील गुटखा बनविण्याच्या कारखान्यापर्यंत पोचले. तेथून गुटखा बनविण्यासाठी लागणाऱ्या आणि पॅकींग करण्यासाठीच्या पाच मशीन, त्यासाठी लागणारा कागद, कच्चा माल, गुटखा भरून ठेवलेली तीन वाहने जप्त केली. गुटखा बनविणाऱ्या तसेच त्याची वाहतूक करणाऱ्या आरोपींना अटक केली. 

राज्यातील विविध भागात गुटखा पोचवण्याचे रॅकेट
यातील आरोपी सिकंदर तांबोळी हा गुटखा तयार करून ट्रकमधून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पुरवठा करण्याचे काम करत होता. राज्यातील विविध भागात गुटखा पोचवण्याचे रॅकेट गुन्हे शाखेने उघडकीस आणले आहे. यात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी एक कोटी 38 लाख 37 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या टोळीत एकूण नऊ आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

हे आहेत आरोपी
गुलाम अहमद सलीम शेख (वय 27, रा. भातांब्रा, बिदर), अकमल अकबर शेख (28), आरिफ फक्रुद्दीन मुल्ला (वय 25, दोघे रा. चिंचोली ता. उमरगा), ओकांर संदीप फंड (वय 26, रा. आंबेगाव बु. कात्रज, पुणे), करण पप्पू प्रजापती (वय 19, रा. उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. तर सिकंदर ऊर्फ अज्जू ऊर्फ अजारोद्दीन तांबोळी, लियाकत तांबोळी आणि इतर आरोपी फरार आहेत. 

हेही वाचा -  चोरट्यांचे पोलिसांना आव्हान! चार ठिकाणी फोडली दुकाने
 
यांनी केली कामगिरी 
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर, पोलिस उपायुक्त वैशाली कडूकर, सहाय्यक पोलिस आयुक्त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय जगताप, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, पोलीस कर्मचारी गणेश शिंदे, सोमनाथ सुरवसे, सागर गुंड, अश्रूभान दुधाळ, औदुंबर आटोळे, इमाम इनामदार, दिलीप नागटिळक, संदीप जावळे, विजय वाळके, संतोष बागलकोटे, अक्षय कुडले, संजय साळुंखे, सनी राठोड, राहुल गायकवाड, नेताजी गुंड, निंबाळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, स्वादिष्ट तंबाखू, सुगंधित सुपारीच्या विक्रीला बंदी आहे. सोलापुरात कोणत्याही भागात गुटख्याची वाहतूक होत असेल किंवा गुटखा विकला जात असेल तर नागरिकांनी 9823233781 या मोबाईल क्रमांकावर माहिती द्यावी. 
- संदीप शिंदे, 
पोलिस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gutakha Action of the Solapur crime branch