वेळूच्या काड्यांचा पारंपरिक आकाशदिवा करण्याची त्यांनी जपलीय कला 

akashdiwa.jpg
akashdiwa.jpg

सोलापूरः आई जवळ बसून काम शिकण्याची गोडी लागली.....तिचे काम पाहत वेळूच्या काड्यांचा आकाशदिवा मी ही बनवला..खळ लावणे.....रंगीबेरंगी कागदाची सजावट......हे आकाशदिव्यांचे पारंपारिक देखणे मनोहारी रुप साकारत गेले.... आईकडून शिकलेली ही आकाशदिवा तयार करण्याची कला तब्बल तीस वर्षापासून जशीच्या तशी चालवली....अनेक कृत्रिम आकाश दिव्याचे दिवस आले अन्‌ गेलेही....माझ्या मागणीला फरक पडला नाही.... त्याला कधी नफ्याचा स्पर्श होऊ दिला नाही. 


कुमठा नाक्‍यातील एका छोट्याशा खोलीत तयार केलेल्या आकाशदिव्यांच्या गर्दीत मांडी घालून बसलेले हिरालाल सोनवळकर आकाशदिव्यांच्या निर्मितीबाबत सांगत होते. 
पूर्वीपासून मी इलेक्‍ट्रीशियन म्हणून काम करत होतो. फावल्या वेळात माझी आई ताराबाई आकाशदिवे तयार करायची. मग आईजवळ बसून तिला काड्या तयार करून दे, खळ लाव, अशी मदत करू लागलो. मग आईला केलेली मदतीमधून माझे मी स्वतःच आकाशदिवे करू लागलो. 

दरवर्षी दिवाळी आली काही महिने आधीच आई हे काम सुरू करायची. वेळू फोडून आणायचे व त्याच्या समान आकाराच्या काड्या तयार करायच्या. नंतर या काड्यांच्या मदतीने सांगाडा तयार करायचा. जिलेटिन व झिरमाळ्याच्या मदतीने गोल, षटकोणी, चौकोनी असे आकाशदिवे तयार होऊ लागले. पावसामुळे जिलेटीन खराब होईल म्हणून कलकत्त्यातून जाड जिलेटीन मागवते. 
मूळ पारंपारिक आकाशदिवा हाच मानला जात असल्याने चोखंदळ ग्राहक आवर्जुन त्याची मागणी करतो. नंतरच्या काळात प्लॅस्टिकचे कितीतरी आकाशदिवे आले तरी हाताने बनवलेल्या या आकाशदिव्यांची सर त्याला येत नाही. त्यामुळे आकाशदिव्यांची विक्रीची चिंता कधीच केली नाही. जवळपास पाच महिने आधीपासून काम त्यांना सुरू करायला घेतो. पूर्वी आईला मदत करायचो. नंतरच्या काळात पत्नी मदत करू लागली. चारशे ते पाचशे आकाशदिवे तयार होऊ लागले. 
या कामात कधीही खंड पडला नाही. वय वाढले तरी आजही हेच काम सुरू आहे. नविन प्लॅस्टिकचे आकाशदिवे आले माझ्या आकाशदिव्याला मागणी कायम राहिली. मी कधीही मजुरीशिवाय या कामात अधिक नफा मिळवला नाही. व्यापारी घरी येऊनच आकाशदिवे घेऊन जातात. गल्लीतील दोन तरुण तयार केलेले आकाशदिवे सात रस्त्यावर जाऊन विकतात. एकही आकाश दिवा कधी शिल्लक राहत नाही. याशिवाय पुणे, मुंबई सारख्या शहरात माल घेऊन जाणारे अनेक जण आहेत. अनेक मोठ्या गावचे लोक घरीच आकाशदिवे नेण्यासाठी येतात. हातापायात बळ आहे तोपर्यंत आईने दिलेला हा कलेचा वारसा जपून ठेवायचा असे सांगत त्यांनी पुढच्या कामाला सुरुवात केली. 


सात फुटांचा आकाशदिवा 
त्यांना एकदा सर्वात मोठा म्हणजे सात फुटांचा आकाशदिवा बनवून द्यावा म्हणून अशी मागणी आली. त्यांनी सातफुट उंचीचा व त्याच्या खाली पाच फुट उंचीच्या झिरमाळ्याची सजावट करून आकाशदिवा तयार करून दिला. या आकाशदिव्याच्या मध्ये एकावेळी एक माणूस उभा राहत असे. या मध्ये आणखी छोटे दोन आकाशदिवे बसवण्यात आले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com