"तो' क्षण पाहण्यासाठी वडील हवे होते 

"तो' क्षण पाहण्यासाठी वडील हवे होते 

सोलापूर ः घरची परिस्थिती अतिशय बिकट. आई-वडिलांनी दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करावे तेव्हाच दोनवेळचे जेवण. परिस्थितीपुढे सर्वजण हतबल. त्यामुळे वडिलांसोबत काम करुन शिक्षण घेण्यावर भर. पण, अडचणींचा डोंगर. बिकट परिस्थितीमुळे भांडी घासण्याची वेळ. अशाही स्थितीत आलेल्या अडचणींवर मात करत फौजी झालोच. पण, फौजी झाल्याचे सुख पाहण्याचा योग वडिलांना आलाच नाही. त्यापूर्वीच ते देवाघरी गेल्याचे अकोलेकाटी (ता. उत्तर सोलापूर) येथील नामदेव लामकाने सांगतात. 

आर्मीच्या परीक्षेचा निकाल मला 15 ऑगस्ट 2010 ला समजला. 10 सप्टेंबर 2010 ला मला आर्मीत जॉईन होण्याचा कॉल आला. पण, माझे दुर्दैव म्हणजे त्याचवेळी माझे वडील देवाघरी गेले. सुखदुखाच्या काळात मित्रांनी मदत केली. माणसाने मनामध्ये एकदा दृढनिश्‍चय केला की, त्याच्या पूर्ततेसाठी हवे ती करण्याची तयारी मनामध्ये ठेवली होती. लामकाने म्हणतात, प्राथमिकचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतले. त्यानंतर माध्यमिकचे शिक्षणही गावातील हायस्कूलमध्ये घेतले. बारावीचे शिक्षण घेण्यासाठी शेळगाव (ता. बार्शी) येथे जावे लागले. बारावीला विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेतला. पण, त्यासाठी पैसे खूप लागत होते. त्यावेळी वडिलांसोबत दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करुन शिक्षणासाठी पैसे गोळा केले. बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकीसाठी नंबर लागला होता. पण, त्याठिकाणी प्रवेश घेण्यासाठी 23 हजार रुपये नव्हते. त्यामुळे प्रवेश घेता आला नाही. पैशाअभावी शिक्षण थांबवावे लागले. काहीच पर्याय नव्हता. शेवटी गावाच्या शेजारी असलेल्या चिंचोळी एमआयडीसीत काम करण्याचा निर्णय घेतला. त्याठिकाणी सहा महिने काम केले. तिथेही नोकरी करायचीच ही जिद्द बसू देत नव्हती. त्यानंतर अक्कलकोट येथे पोलिस भरती प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतला. 2010 मध्ये झालेल्या भरतीमध्ये शारीरिक चाचणी दिली. त्यानंतर नायगाव (मुंबई) येथे लोहमार्ग पोलिसांसाठी लेखी परीक्षा झाली. त्यात 164.80 गुण मिळाले होते. पण, यादी प्रत्यक्षात 165 वर बंद झाली. त्याठिकाणी नंबर लागला नाही. पण, हार मानली नाही. काही दिवस मुंबईतील "मनोरा' या आमदारांच्या निवासस्थानी थांबलो. त्यानंतर कोल्हापूर येथे आर्मीची भरती निघाली होती. त्याठिकाणी आर्मीची शारीरिक चाचणी क्‍लिअर केली. "काहीही झाले तरी नोकरी लागल्याशिवाय गावाकडेच जायचे नाही' असा निश्‍चयच केला होता. त्यानंतर नोकरी शोधण्यासाठी पुण्याला जावे लागले. पुणे येथील मगरपट्यात दोन दिवस भांडी घासण्याचे काम केले. त्यावेळी त्याठिकाणच्या मॅनेजरने बोलावून घेतले. बारावी झाला आहे म्हटल्यावर त्यांनी मुलाखत घेऊन काऊंटरला बसविले असेही श्री. लामकाने यांनी सांगितले. त्याच काळात परीक्षा झाली. त्यानंतर तवांग (अरुणाचल प्रदेश) याठिकाणी पोस्टिंग मिळाली. आर्मीमध्ये टेक्‍निकल पदावर निवड झाली होती. अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश (लखनौ), राजस्थान व आता मागील 15 दिवसांपूर्वी पंजाब येथे बदली झाली आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com