अपघातात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जून 2020

बागवान यांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. अक्कलकोट शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

सोलापूर : अक्कलकोट रस्त्यावर आज रात्री झालेल्या कार व दुचाकी अपघातात जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कनिष्ठ सहाय्यकाचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले आहेत.अपघातात जिल्हा परिषद कर्मचारी गौसपाशा इमामभाई बागवान (रा. सलगर, ता. अक्कलकोट) यांचा मृत्यू झाला. ते आपले काम संपवून जिल्हा परिषदेहून आपल्या गावाकडे निघाले असता, त्यांच्या दुचाकीला कार (एमएच 15 सीटी 9783)ची धडक बसली. त्यात बागवान यांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. अक्कलकोट शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

हेही वाचा : बार्शी तालुक्‍यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू 

पोलिसांनी सांगूनही दुचाकीस्वार डबलशिट 
सोलापूर : शहरातील कोरोनाचा वाढता आलेख चिंताजनक असल्याने पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी दुचाकीवर एक तर रिक्षात दोन प्रवासी असतील, असे स्पष्ट केले. मात्र, शहरात दोन्ही नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. 
शहरात दररोज सात रस्ता परिसरात वाहनांची तपासणी केली जात असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. सोमवारी (ता. 22) पोलिसांनी 639 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात एंट्री केल्यापासून छत्रपती शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सात रस्ता, आसरा अशा महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जेणेकरून सोशल डिस्टन्सचे पालन तंतोतंत होईल आणि कोरोना या विषाणूची साखळी खंडित होण्यास मदत होईल, असा विश्‍वास सोलापूरकरांना वाटत आहे.

 

भोगावात युवकाची आत्महत्या 
सोलापूर :
उत्तर सोलापूर तालुक्‍यातील भोगाव येथील सिमेंट गोडाऊनमध्ये 28 वर्षीय तरुणाने आज (सोमवारी) गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपक भीमा बनसोडे, असे त्याचे नाव आहे. त्याला उपचारासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. याप्रकरणी सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे. 

हेही वाचा : ग्रामीणमध्ये कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींना इतरही आजार 

चक्‍कर येऊन एकाचा मृत्यू 
सोलापूर :
येथील सैफुल परिसरातील वैष्णवी नगरात राहणारे विजयकुमार शिवय्या बउदापुरे (वय 60) यांना आज (सोमवारी) अचानक चक्‍कर आली आणि त्याचवेळी उलटीही झाली. त्यांचे नातू केदार कावेकर यांनी विजयकुमार यांना सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या प्रकरणाची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे. 

मानसिक आजारातून स्वत:चाच चिरला गळा 
सोलापूर :
येथील सरस्वती चौक परिसरात राहणाऱ्या तरुणाने मानसिक आजारातून स्वत:चाच गळा चिरून घेतला. त्यानंतर त्याला तत्काळ उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. अक्षय तिमोती जंगम, असे त्या तरुणाचे नाव असून त्याची प्रकृती स्थिर असून तो शुद्धीवर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या प्रकरणाची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health department employee dies in accident