कोरोना संकटात उपचार देणारी आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर; वाचा सविस्तर 

दत्तात्रय खंडागळे
Tuesday, 4 August 2020

सांगोला तालुक्‍यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी अपुरे असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार कसे करायचे? या विचाराने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. तालुक्‍यातील आरोग्य खात्यातील 84 पदे रिक्त असल्याने वैद्यकीय सेवेचा बोजवारा उडाला आहे. सांगोला तालुक्‍यात 6 प्राथमिक आरोग्य केंद्र व 39 उपकेंद्रे आहेत. रिक्त पदांवर नेमणुका न झाल्याने प्राथमिक आरोग्य व उपकेंद्राची अवस्था बिकट झाली आहे. 

सांगोला (सोलापूर) : कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. कोट्यवधी रुपये खर्चून सरकारी दवाखान्यांच्या इमारती तयार असूनही सेवा देण्यासाठी डॉक्‍टरांसह कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची भरती होऊ शकलेली नाही. त्यामुळे कोरोनाच्या संकटात सांगोला तालुक्‍यात सुमारे 84 पदे रिक्त आल्याने आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र दिसत आहे. 

हेही वाचाः अनुकरणीय: सेवानिवृत्त शिक्षकाने सुरू केली पेन्शनच्या रकमेतून वृक्षसंवर्धनाची चळवळ 

सांगोला तालुक्‍यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी अपुरे असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार कसे करायचे? या विचाराने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. तालुक्‍यातील आरोग्य खात्यातील 84 पदे रिक्त असल्याने वैद्यकीय सेवेचा बोजवारा उडाला आहे. सांगोला तालुक्‍यात 6 प्राथमिक आरोग्य केंद्र व 39 उपकेंद्रे आहेत. रिक्त पदांवर नेमणुका न झाल्याने प्राथमिक आरोग्य व उपकेंद्राची अवस्था बिकट झाली आहे. 
घेरडी प्रा.आ. केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 6 पदे मंजूर असून प्रा.आ.केंद्र अकोला, नाझरे, घेरडी, कोळा, महूद येथील 5 पदे रिक्त आहेत. 

हेही वाचाः वाहव्वा! सांघिक प्रयत्नामुळे या गावाची वाटचाल कोरोना मुक्तीकडे 

आरोग्य सहाय्यक पाच पदे मंजूर असून महूद येथील एक पद रिक्त आहे. आरोग्य सहायिका 6 पदे मंजूर असून अकोला, कोळा, घेरडी येथील तीन पदे रिक्त आहेत. 
आरोग्य सेवकाची 34 पदे मंजूर असून जवळा 2, कोळा अंतर्गत 4, महूद अंतर्गत 6, अकोला अंतर्गत 4, घेरडी अंतर्गत 1 अशी 17 पदे रिक्त आहेत. आरोग्य सेवक हिवतापाची 13 पदे मंजूर असून नाझरे अंतर्गत 2, जवळा अंतर्गत 1, घेरडी अंतर्गत 1, महूद अंतर्गत 2 अशी 6 पदे रिक्त आहेत. 
आरोग्य सेविकांची 59 पदे मंजूर असून अकोला अंतर्गत 2, जवळा अंतर्गत 6, घेरडी अंतर्गत 4, कोळा अंतर्गत 6, महूद अंतर्गत 11, नाझरे अंतर्गत 4 अशी 33 पदे रिक्त आहेत. परिचरची 25 पदे मंजूर असून अकोला 3, नाझरे 2, जवळा 3, घेरडी 4, कोळा 3, महूद 2 अशी 17 पदे रिक्त आहेत अशी एकूण सांगोला तालुक्‍यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्राची 187 पदे मंजूर असून तब्बल 84 पदे रिक्त आहेत. आरोग्य सेवक, सेविका, परिचर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांची जास्त पदे रिक्त असल्याने कोरोनाच्या संकटकाळात त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. 

सर्वाधीक कोरोना रुग्णांच्या गावात पदे रिक्त 
सांगोला तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील जवळा 12, कोळा 14, महूद 25, नाझरा 9, अकोला 11, घेरडी 13 अशी 84 पदे रिक्त आहेत. सर्वात जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या महूदमध्ये सर्वाधिक रिक्त पदे आहेत.  
 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On a health system ventilator that treats corona crisis; Read detailed