अनुकरणीय : सेवानिवृत्त शिक्षकाने सुरू केली पेन्शनच्या रकमेतून वृक्षसंवर्धनाची चळवळ 

Planting
Planting

बेगमपूर (सोलापूर) : सेवानिवृत्तीनंतर सहसा पेन्शनची रक्कम ठेवीच्या रूपाने व इतर बॅंकांच्या योजनांमध्ये गुंतवून उर्वरित भविष्याची तजवीज करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र बेगमपूर (ता. मोहोळ) येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाने पेन्शनच्या रकमेतून वृक्ष लागवड व त्याची देखभालही स्वतःच करण्याचा संकल्प केला असून, येथील दर्गाह परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. अशाप्रकारे त्यांनी वृक्षसंवर्धनाची चळवळ सुरू केली आहे. 

श्रावण केरू गवळी (वय 72) हे प्राथमिक शिक्षक 2007 मध्ये मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शन रकमेचा काही हिस्सा पर्यावरण व सामाजिक कार्यासाठी खर्च करावा, या हेतूने त्यांनी लोखंडी जाळीसह 25 विविध प्रकारच्या निवडक रोपांची खरेदी केली. कार्यक्रमाचे नियोजनही अनावश्‍यक खर्चाला फाटा देत साध्या पद्धतीने केले. कामती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. या वेळी सरपंच हरिभाऊ काकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष असलम चौधरी, जिल्हा कॉंग्रेस सरचिटणीस सुलेमान तांबोळी, माजी उपसरपंच हणमंत कावळे, बाळासाहेब जामदार, माणिक तांबोळी, शंकर सरवळे, मुबारक शेख, ग्रामसेवक हरीश पवार, पोलिस हेड कॉन्स्टेबल अमोल नाईकवाडे, समीर पठाण, इरफान जहागीरदार, हणमंत लोहार, जाकीर फुलारी आदी उपस्थित होते. 

दरवर्षी अनेक जण वृक्षारोपण कार्यक्रम राबवितात. वृक्षारोपण करतात परंतु त्याच्या संवर्धनासाठी जाणीवपूर्वक कोणतीही व्यवस्था वा प्रयत्न शक्‍यतो केले जात नाहीत. परंतु सेवानिवृत्तीनंतर एका शिक्षकाने स्वखर्चाने संरक्षक जाळीसह वृक्षारोपणाचा राबविलेला उपक्रम नक्कीच आदर्श व प्रेरणादायी आहे, असे मत सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांनी व्यक्त केले. पुढील वर्षी झाडांचे वाढदिवसही साजरा करणार असल्याचे संयोजक श्रावण गवळी यांनी सांगितले. या वेळी सुलेमान तांबोळी, अस्लम चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. सुलेमान तांबोळी यांनी आभार मानले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com