माढा शहर व परिसरात पहाटे जोरदार पाऊस; दुकानांमध्ये शिरले पाणी 

किरण चव्हाण
Tuesday, 15 September 2020

माढा तालुक्‍यात मंडळनिहाय मंगळवारी झालेला पाऊस : माढा - 70.2, कुर्डूवाडी 56.4, टेंभूर्णी - 48.4, रांझणी - 31, दारफळ - 35.1, म्हैसगाव 47.3, रोपळे (कव्हे) - 10.3, लऊळ - 13.4, मोडनिंब 10.4. तालुक्‍यात सरासरी 35.8 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

माढा (सोलापूर) : माढा परिसरात मंगळवारी (ता. 15) पहाटे जोरदार पाऊस झाला असून पावसामुळे रब्बीच्या पेरणीला दिलासा मिळाला आहे. तालुक्‍यातील सर्वत्र दमदार पाऊस झाला आहे. माढ्यात 70.2 तर तालुक्‍यात सरासरी 35.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 
माढा तालुक्‍यात मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. माढा शहरासह तालुक्‍यात अनेक ठिकाणी झालेला हा पाऊस रब्बीच्या पेरणीसाठी उपयुक्त आहे. यंदाचा खरिपाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला आहे. रब्बी हंगामातील पेरणीसाठी शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. माढा, कुर्डूवाडी, म्हैसगाव, वडशिंगे भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. खरिपाचा हंगाम हाती आल्याने आता रब्बीचा हंगाम मलाही पावसाने साथ दिल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. 
माढा तालुक्‍यात मंडळनिहाय मंगळवारी झालेला पाऊस : माढा - 70.2, कुर्डूवाडी 56.4, टेंभूर्णी - 48.4, रांझणी - 31, दारफळ - 35.1, म्हैसगाव 47.3, रोपळे (कव्हे) - 10.3, लऊळ - 13.4, मोडनिंब 10.4. तालुक्‍यात सरासरी 35.8 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 
सालसे-यावली रस्त्याच्या कामाच्या गटारीमुळे पावसाचे पाणी दुकानात शिरल्याने माढ्यातील तीन दुकानदारांचे सुमारे वीस लाख 55 हजारांचे नुकसान झाले असून याबाबत संबंधित दुकानदारांनी तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग व माढा नगरपंचयातीकडे तक्रार अर्ज दिला आहे. 
याबाबत पांडुरंग कृषी केंद्राचे अतुल मोरे, सखी लेडिज कलेक्‍शन व टेलरिंगच्या वैशाली भोसले, गोरे इलेक्‍ट्रॉनिक्‍सचे पांडुरंग गोरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की यावली-सालसे या रस्त्याचे सध्या माढ्यात काम सुरू आहे. शिवाजीनगर भागात असलेल्या पूर्वेकडील भागात गटारीचे काम सध्या सुरू आहे. वरील तक्रादारांच्या दुकानासमोर गटारीचे काम अर्धवट स्थितीत आहे. हे काम करताना पाणी वाहून जाण्याची सोय केली नाही. त्यामुळे सोमवारी (ता. 14) रात्री दुकान बंद केल्यानंतर रात्री मोठा पाऊस आल्याने दुकानात पाणी शिरून नुकसान झाले आहे. यामध्ये पांडुरंग कृषी केंद्राचे सुमारे चार लाख 70 हजार, सखी लेडिज कलेक्‍शन व टेलरिंगचे दोन लाख 85 हजार तर गोरे इलेक्‍ट्रॉनिक्‍सचे 13 लाख रुपये, असे सुमारे वीस लाख 55 हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 
दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत माढ्यातील दुकानात पाणी गेलेल्या ठिकाणची बुधवारी (ता. 16) पाहणी करणार करून अहवाल देणार असल्याचे शाखा अभियंता आनंद नाझरे यांनी सांगितले. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rain in Madha city water seeping into shops