प्रदूषण टाळण्यासाठी फटाके न वाजविता गरजूंना करावी मदत : सोलापूरकरांनी केले आवाहन 

fatakemukt diwali.jpg
fatakemukt diwali.jpg

सोलापूरः दिवाळीचा सण साजरा करताना या वर्षी या सणाला कोरोनाची पाश्‍वभूमी आहे. प्रदूषण व निसर्गरक्षण हे दोन्ही मुद्दे कोरोनाच्या साथीमध्ये अत्यंत महत्वाचे ठरले. त्यादृष्टीने ही दिवाळी फटाके न वाजवता साजरी व्हावी, अशी भूमिका मांडली जात आहे. 

यावर्षीचा दिवाळीचा सण अत्यंत वेगळ्या पार्श्‍वभूमीवर साजरा होत आहे. लॉकडाउनमध्ये कमी झालेल्या प्रदूषणाची पातळी कायम राखण्याची जबाबदारी लॉकडाउननंतर नागरिकांवर आली आहे. कोरोना संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना त्यांची दिवाळी आनंदात साजरी करण्यासाठी मदतीची गरज देखील मोठी आहे. 


कोरोनामुक्त लोकांना फटाक्‍याच्या प्रदूषणापासून वाचवणे आवश्‍यक झाले आहे. त्यामुळे यावर्षीची दिवाळी फटाकेमुक्त व्हावी अशी संकल्पना मोठ्या प्रमाणात मांडली जात आहे. या बाबत विद्यार्थी, महिला व नागरिकांनी फटाके मुक्तीबद्दल त्यांची भूमिका मांडली आहे. 


फटाक्‍यांऐवजी झाडे लावतो 
मी स्वतः दरवर्षी कधीच फटाके वाजवत नाही. मी व माझा भाऊ हे दोघेही दरवर्षी दिवाळीत प्रत्येकी एक झाड आणतो. हे झाड दिवाळीला लावतो. फटाके न वाजवता खर्च वाचवला तर त्यामध्ये अधिक झाडे लावता येतील. माझे मित्र देखील अशाप्रकारे फटाके न वाजवता दिवाळी साजरी करतात. प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी देखील या पूर्वी आम्हाला शाळेत मार्गदर्शन केले होते. त्यानुसार फटाके न वाजवता दिवाळी साजरी करणार आहे. 
- संकेत व्हनमने, जुळे सोलापूर 

फटाकेमुक्त दिवाळी व्हावी 
दिवाळी म्हणजे दिपोत्सव व मिठाईची देवाण घेवाण, मुलांचा उत्साह आणि आनंद म्हणजे फटाके. आपण या वर्षी एका महाभयंकर संकटाला सामोरे जात आहोत तो म्हणजे महाभयंकर रोग कोविड. चला तर या वर्षी आपल्या देशासाठी, आपल्यासाठी या कोरोनाच्या काळात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करूया. हे फटाके ध्वनी आणि वायू प्रदूषणाचे मूळ कारण ठरतात. फटाक्‍यांच्या धुरामूळे हवेचे प्रदूषण वाढते आणि फुफ्फूसाचे आजार वाढतात. हे आजार या काळात खूप धोकादायक आहेत. त्याचा लहान मुलांवर, वृद्धांवर, गरोदर स्त्रियांवर विपरीत परिणाम होतो. आपणच आपल्या देशाची, आपल्या राष्ट्राची आपल्या माणसांची काळजी घ्यायला हवी म्हणूनच या वर्षी आपण सगळ्यांनी मिळून फटाके मुक्त दिवाळी साजरी करूया. 
- समृद्धी पाटील, सोलापूर 

फटाके न घेता गरजूंना मदत करावी 
फटाक्‍यांचा खर्च वाचवून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करता येणार आहे. मात्र या फटाक्‍याच्या खर्चातून इतर गरजूंची दिवाळी साजरी करण्यासाठी हातभार लागू शकेल. यावर्षी कोरोना मुळे अनेकाची आर्थिक स्थिती वाईट आहे. अशा गरजूंना दिवाळी सणाचा आनंद मिळावा म्हणून आपण फटाक्‍यांचा खर्च वाचवून त्या रकमेचा उपयोग गरजूंच्या दिवाळीसाठी केला पाहिजे. फटाक्‍यामुळे प्रदूषण वाढते त्यामुळे त्याचा उपयोग कोणताही नाही. समाजात गरजूंना मिठाई दिली तर त्यांची पोटे भरणार आहेत. ही भावना प्रत्येकाने जपली तर दिवाळीचा सण आनंदाने साजरा होणार आहे. 
- विद्या भोसले, निसर्गप्रेमी 

मागील वर्षापासून फटाके आणत नाही 
मागील दोन वर्षापासून मी शाळेत सांगितल्याप्रमाणे फटाके मुक्त दिवाळी साजरी करतो. फटाक्‍यामुळे प्रदूषण होते. त्यामुळे दिवाळीत फटाके आणत नाही. माझे अनेक वर्गमित्र याच पध्दतीने फटाके न वाजवता दिवाळी साजरी करतात. त्याएैवजी आम्ही गरजूंना मिठाई व कपडे वाटप करतो. अशा पध्दतीने आम्ही दिवाळी साजरी करतो. 
- मंथन रमेश जाधव, मेहता प्रशाला 


फुफ्फुसाच्या आजारासाठी फटाके टाळावे 
कोरोना संकटामध्ये यावर्षी अनेक कुटुंबाची दिवाळी साजरी करण्याची आर्थिक स्थिती नाही. त्याचा विचार फटाकमुक्तीतुन व्हावा. अनेकांना कोरोनाच्या आजारात फुफ्फुसावर गंभीर परिणाम झाले. त्यांना दिवाळी फटाक्‍याचे प्रदूषण त्रासदायक ठरणार आहे. फुफ्फुसावर त्याचा परिणाम होऊ शकतो. रुग्णांची संख्या पाहता आज प्रत्येक भागात बरे झालेले रुग्ण आहे. त्यांना फटाके प्रदूषणाचा होणार त्रास टाळला पाहिजे. प्रत्येकाने या काळात आपली जबाबदारी ओळखून फटाके टाळले तर ते योग्य असणार आहे. 
- डॉ. वैशाली आगावणे, दमानी नगर, सोलापूर 

दोन पिढ्यांपासून फटाकेमुक्त दिवाळी 
माझ्या आईने मला लहानपणी समजावले. तेव्हा पासून मी फटाके वाजवत नाही. नंतर हीच गोष्ट मी माझ्या मुलांना समजावून सांगितली. तेव्हा त्यांनी पण दिवाळीत फटाके उडवणे बंद केले. खर तर लहान मुलांची समजूत काढणे खूप अवघड असते पण मुलेही तेवढीच समजदारपणे ही गोष्ट मान्य करतात. मागील बत्तीस वर्षापासून आमचे कुटुंब फटाके उडवत नाही. यासाठी मुलांचे कौतुक केले पाहिजे. आम्ही लॉकडाउनपासून गरजूंना मदत करतोय. रेल्वे बंद पडल्याने रेल्वेतील फेरीवाल्यांना आम्ही मदत पोहोचवली आहे. फटाक्‍यामुळे प्रदूषणासोबत इतरांना त्रास होतो. 
- नमिता प्रभू, एनटीपीसी परिसर. 

फटाके टाळलेलेच बरे 
दिवाळीचा सण साजरा करताना हा सण प्रदूषणमुक्त असावा याला महत्व देण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःची जबाबदारी ओळखली पाहिजे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत फटाके टाळलेलेच बरे. या पूर्वी जळते रॉकेट लगतच्या माळरानावर पडून दुर्घटना घडली होती. प्रदुषणमुक्त सण असावा हे महत्वाचे आहे. निसर्गाला जपण्याचे काम प्रत्येकाने केले पाहिजे. त्यासाठी जागरूकता असावी. दिवाळीचा सण हा प्रदूषण मुक्त व्हावा. 
- शिवकूमार मोरे, न्यू बुधवार पेठ 

प्रदूषण वाढविणे चुकीचे 
लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणात निसर्गाची स्थिती अधिक चांगली झाली. त्याचा चांगला परिणाम पाहण्यास मिळाला आहे. आता दिवाळीत फटाके फोडून पून्हा निसर्गाला प्रदूषणाद्वारे बिघडवण्याचे काम होऊ नये. फटाक्‍यावर विनाकारण पैशाचा अपव्यय करू नये. यावर्षी कोरोनाचे संकट होते तसेच नंतर ओला दुष्काळ झाला. समाजातील अनेकांची आर्थिक स्थिती चांगली नाही. तेव्हा त्यासाठी सर्वांनी एकमेंकांना मदत करण्याची देखील हीच वेळ आहे. अधिकाधिक गरजूंपर्यंत मदत पोहोचवली पाहिजे. 
- राजकुमार उंबरजे, विशालनगर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com