"पिंपरी'ला पाणीदार करण्यासाठी झटतोय प. आफ्रिकेतील हेमंत काटमोरे ! पिकांबाबत सोशल मीडियाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शनही

शांतिलाल काशीद 
Wednesday, 16 December 2020

खालावलेल्या आर्थिक परिस्थितीत देखील आफ्रिकेतील एक देश मदत करतोय हे पाहून गावातील नागरिकांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला आणि तेथूनच पिंपरी हे गाव पाणीदार होण्यास खऱ्या अर्थाने मदत झाली. आज पिंपरी गावाची पाण्याच्या समस्येतून सुटका झालेली दिसत आहे. ग्रामीण भागातील युवकांना जागतिक पातळीवरील रोजगाराच्या नवनवीन संधींची माहिती देण्याचे काम आफ्रिकेतून हेमंत काटमोरेद्वारे केले जात आहे. 

मळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील पिंपरी (सा) येथील युवक हेमंत तानाजी काटमोरे (28 वर्षे) हा गावापासून बारा हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या पश्‍चिम आफ्रिकेतील "गॅबॉन' व "आयव्होरी कोष्ट' देशात गेल्या दोन वर्षांपासून नोकरी करीत आहे. आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, आनंदवन येथून बीएस्सी ऍग्रीचे शिक्षण घेतलेल्या हेमंत काटमोरेने आपल्या देशाशी व गावाशी जोडलेली नाळ कधीच तुटू दिली नाही. "घार हिंडे आकाशी लक्ष तिचे पिलांपाशी' या उक्तीप्रमाणे हेमंत बार्शी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना आफ्रिकेतून आजही शेतीविषयक मार्गदर्शन करतोय. 

हेमंत हा अननस, केळी, द्राक्ष, ऊस, सीताफळ, बोर, साबुदाणा, सिमला मिरची आशा विविध पिकांच्या देखभालीसंदर्भात व अधिकच्या उत्पन्नासंदर्भात व्हॉट्‌सऍप, फेसबुक, व्हिडिओ कॉलद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. गूगल ट्रान्सलेटरद्वारे हेमंत काटमोरेने विविध भाषांवर प्रभुत्व मिळवले आहे. मिळविलेल्या ज्ञानाच्या आधारे विविध देशांत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. ज्या समाजात आपण वाढलो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, या भावनेतून "सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेत भाग घेतलेले पिंपरी (सा) गाव पाणीदार करण्यासाठी आफ्रिकेतील गॅबॉन देशातून आर्थिक मदत मिळवून देण्याचे कार्य हेमंत काटमोरेने केले आहे. त्याच्या कार्याची दखल घेत आमीर खान व किरण राव यांनी सोशल मीडियाद्वारे हेमंतचे अभिनंदन केले. 

खालावलेल्या आर्थिक परिस्थितीत देखील आफ्रिकेतील एक देश मदत करतोय हे पाहून गावातील नागरिकांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला आणि तेथूनच पिंपरी हे गाव पाणीदार होण्यास खऱ्या अर्थाने मदत झाली. आज पिंपरी गावाची पाण्याच्या समस्येतून सुटका झालेली दिसत आहे. ग्रामीण भागातील युवकांना जागतिक पातळीवरील रोजगाराच्या नवनवीन संधींची माहिती देण्याचे काम आफ्रिकेतून हेमंत काटमोरेद्वारे केले जात आहे. हेमंत काटमोरे व त्याच्या सहकाऱ्यांनी आपल्या कमाईतून मिळणारी काही रक्कम गॅबॉन व आयव्होरी कोष्ट देशातील गरजूंना साहित्याच्या रूपाने देऊन जगाच्या पाठीवर देखील माणुसकी जिवंत आहे, हे दाखवून दिले आहे. 

हेमंतचे वडील तानाजी काटमोरे कीर्तनाच्या माध्यमातून बार्शी तालुक्‍यासह इतर भागात समाजप्रबोधन करीत आहेत. त्यांच्या संस्कारावर व विचारांवर पुढे जात हेमंत कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांची सेवा करीत आहे. घरातूनच धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक वारसा मिळालेला हेमंत दूरदेशी जाऊनही आपल्या गावाशी व देशाशी जोडलेली विचारांची व संस्काराची नाळ तुटू देत नाही, हे गौरवास्पद आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hemant Katmore from West Africa is trying to solve the water problem in Pimpri village