कराची आणि आफ्रिकेतील नागरिकांचेही सोलापुरात वास्तव्य

कराची आणि आफ्रिकेतील नागरिकांचेही सोलापुरात वास्तव्य

सोलापूर : श्री सिद्धेश्‍वर तलाव, कापड उत्पादक गिरण्यांमुळे सोलापूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली. त्याचा वेग इतका होता की, 100 वर्षांत लोकसंख्या वाढीचे प्रमाण आठपट होते. 1851 मध्ये शहराची लोकसंख्या 30 हजार 819 होती. ती 1951 मध्ये दोन लाख 66 हजार 50 इतकी झाली. लोकसंख्येच्या वाढीला सिद्धेश्‍वर तलाव कारणीभूत होता. पाकिस्तानातील कराची आणि आफ्रिकेत जन्मलेले लोकही सोलापुरात वास्तव्यास होते. 

शहरात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्‍न होता. उन्हाळ्यात तर पाण्याचा शोध घेण्यासाठी मैलोन्‌ मैल फिरावे लागे. तलावाची निर्मिती झाल्यावर या हालअपेष्टा कमी झाल्या. मात्र, त्याच वेळी तलावातील अशुद्ध पाण्यामुळे कॉलऱ्याची साथही पसरली. तलावात पाणी यायच्या ठिकाणी घाण पसरलेली असे. त्यामुळे तलावात कायमचे अस्वच्छ पाणी असे. दरम्यान, नगरपालिकेने एकरुख तलावाचे पाणी शहरात नळाद्वारे देण्यास सुरवात केल्यावर ही गैरसोय दूर झाली. एकरुख तलावाचे पाणी शेतीसाठी कालव्यातून 1871 मध्ये सोडण्यात आले. पण नळाद्वारे पाणीपुरवठा 1881 मध्ये सुरू झाला. कापड उत्पादक गिरण्यांमुळेही लोकसंख्येत मोठी वाढ झाली. 28 डिसेंबर 1876 रोजी जुनी गिरणी सुरू झाली. त्यानंतर 1898 मध्ये नरसिंग गिरजी व लक्ष्मी गिरणी सुरू झाली. त्यानंतर 11 वर्षांनी जाम मिल व विष्णू मिल सुरू झाली. त्यामुळे 1876 ते 1909 या काळात शहराच्या लोकसंख्येत खूप मोठी वाढ झाली. 

शहराची पहिली सार्वत्रिक जनगणना 1872 मध्ये झाली. त्यामध्ये 53 हजार 304 लोकसंख्या होती. तसेच शहरात एकंदर आठ हजार 720 घरे होती. त्यापैकी दोन हजार 27 चांगली, 333 मध्यम प्रतीची घरे होती. 1836च्या सुमारास तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांनी शहरात तीन हजार 600 घरे व सुमारे 30 हजार लोकसंख्या असल्याचे म्हटले आहे. त्या आकड्यांची तुलना करता 1836 ते 1872 या कालावधीत शहरातील घरांत व लोकसंख्येत किती वाढ झाली, हे स्पष्ट होते. 1878 मध्ये शहराच्या लोकसंख्येवर कॉलऱ्याच्या साथीचा परिणाम झाला. त्यामध्ये 309 लोक मरण पावले. तापामुळे 1878 व 1879 मध्ये अनुक्रमे दोन हजार 917 आणि दोन हजार 253 लोक मरण पावल्याची नोंद आहे. 1886-87 मध्ये नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या जनगणनेनुसार शहरातील तीन हजार मुस्लिम व विणकर कमी झाल्याची नोंद आहे. शहरात सुरू असलेल्या गिरण्यांशी स्पर्धा करणे शक्‍य नसल्याने हे लोक गाव सोडून गेल्याचे पालिकेच्या तत्कालीन अहवालात म्हटले आहे. सार्वत्रिक जनगणनेच्या वेळी शहरात प्लेगची साथ होती. त्यामुळे बहुतांश लोक शहर सोडून जात. त्याचा परिणाम असा झाला की 89 हजार 424 लोकसंख्या असताना प्रत्यक्षात शहरात 61 हजार 345 लोक राहात होते. 

प्लेगची मोठी साथ शहरात 1901 ते 1920 या काळात पसरली. हैदराबाद पोलिस ऍक्‍शनच्या वेळी शहरात स्टेटमधील बरेच लोक येऊन राहिले. त्यामुळे शहराच्या लोकसंख्येत हंगामी वाढ झाली. ऍक्‍शननंतर आलेले लोक परत गेल्याने लोकसंख्या पूर्वस्थितीला आली. लोकसंख्या वाढीबाबत विचार केला असता असे दिसून येते की मुंबईत प्रांतात अत्यंत झपाट्याने वाढ झालेल्या शहरात सोलापूर हे एक अग्रगण्य शहर होते. 1851 ते 1951 या 100 वर्षांतील सोलापूर शहरातील दशवार्षिक लोकसंख्या कंसात - 1851 (30819), 1872 (53,403), 1881 (61,281), 1891 (61915), 1901 (75288), 1911 (61345), 1921 (1,13,931), 1931 (1,35,574), 1941 (2,03,691) आणि 1951 (2,66,050). 

 
जन्म इतरत्र, वास्तव्य सोलापुरात 
1901 मध्ये झालेल्या जनगणनेच्या वेळी इतर जिल्ह्यांत व परदेशात जन्मलेल्या पण सोलापूर शहरात वास्तव्य असलेली लोकही मोठ्या संख्येने होती. त्याचा तपशील ः मुंबई शहर (282), अहमदाबाद (84), सूरत (55), ठाणे (31), खानदेश (80), नाशिक (92), नगर (415), पुणे (1035), सातारा (592), धारवाड (198), कराची (18), कुलाबा (36), रत्नागिरी (159), बेळगाव (65), विजयपूर (737), मुंबई प्रांत व अन्य जिल्हे (40), विविध संस्थाने (643), कच्छ (7), काठेवाड (26), मुंबईखेरीज इतर प्रांतांतून (9620), युरोप (58), भारताबाहेरील पण आशिया खंडातील (4), आफ्रिका (एक) असे निरनिराळ्या ठिकाणी जन्मलेले लोक सोलापूर शहरात राहात होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com