पार्सल, होम डिलिव्हरीत 95 टक्‍क्‍यांनी घटला हॉटेल व्यवसाय 

प्रमोद बोडके
Thursday, 18 June 2020

केव्हा मिळणार हॉटेलमधून सेवा? 
कोरोनाचे संकट कधी संपणार? असाच प्रश्‍न उद्योजक, व्यावसायिक व नोकरदार यांच्याकडून विचारला जात आहे. या प्रश्‍नाचे ठोस उत्तर कोणाकडेही नसल्याने भविष्याचा अंदाज बांधणे आणि आर्थिक नियोजन करणे या गोष्टी कठीण झाल्या आहेत. सोलापूर शहर व परिसरातील ज्या हॉटेलमध्ये सोशल डिस्टन्सचे पालन करणे शक्‍य आहे. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे ज्या हॉटेल चालक/मालकांना शक्‍य आहे, त्यांना हॉटेलमधून सेवा देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी सोलापूर शहर व परिसरातील हॉटेल व्यावसायिकांकडून होऊ लागली आहे. 

सोलापूर  : कोरोनाच्या संकटाला तोंड देत असतानाच आता आर्थिक मंदीच्याही संकटाला तोंड द्यावे लागत आहे. कोरोनाच्या भीतीने बंद झालेले हॉटेल, रेस्टॉरंट नंतरच्या काळात होम डिलिव्हरी व पार्सलसाठी सुरू करण्यात आले. हॉटेल सुरू करण्यासाठी येणारा खर्च, घरपोच खाद्यपदार्थ देण्यासाठी नामांकित कंपन्या घेत असलेले कमिशन, या सर्वांचा हिशेब केल्यास हॉटेल चालक व मालकांच्या हातात काहीच राहात नसल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. लॉकडाउनपूर्वीच्या हॉटेल व्यवसायाच्या तुलनेत आता जवळपास 95 टक्‍क्‍यांची घट झाल्याची माहिती समोर येत आहे. 

शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसाठी सोलापूरची वेगळी ओळख आहे. त्यामुळे सोलापुरात अस्सल मऱ्हाठमोळ्या जेवणापासून ते मटन आणि चिकनच्या विविध डिश या ठिकाणी मिळतात. बहुभाषिक शहर असल्याने सोलापूरच्या खाद्यसंस्कृतीत वैविध्य आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेशच्या सीमेवर आणि पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर या आध्यात्मिक पर्यटनामुळे सोलापुरातील हॉटेल व्यवसायात मोठी गुंतवणूक झालेली आहे. सोलापूर शहर व परिसरातील हॉटेल व्यवसायावर जवळपास 15 ते 20 हजार कामगार व त्यांचे कुटुंब अवलंबून आहेत. मार्चपासून ते आतापर्यंत हॉटेल व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालत नसल्याने या कामगारांच्याही रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

रोजगार आणि व्यवसाय टिकला पाहिजे

लॉकडाउनपूर्वी असलेला व्यवसाय आणि आताचा व्यवसाय यामध्ये जवळपास 90 ते 95 टक्‍क्‍यांचा फरक पडला आहे. हॉटेल सुरू ठेवण्यासाठी आवश्‍यक असलेला खर्च करावाच लागतो. होम डिलिव्हरी आणि पार्सलसाठी ग्राहकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. कोरोनाचा मुकाबला करत असतानाच आपल्यातील रोजगार आणि व्यवसाय टिकला पाहिजे. आवश्‍यक असलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याची सूचना देऊन हॉटेल व्यवसाय पूर्वीप्रमाणे सुरू करणे आवश्‍यक आहे. 
- इंद्रजित पवार, हॉटेल इंद्रप्रस्थ, कोंडी 

व्यावसायिक हतबल

सर्व व्यापार, बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहेत, परंतु अद्यापही फास्टफूड, वडापाव यासारखे व्यवसाय सुरू झाले नाहीत. लहान व्यावसायिक व हॉटेल कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. घरपोच पार्सलसाठी देण्यात आलेली सवलत आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. रोजचा खर्च पाहता ऑनलाइन किंवा पार्सलसाठी तेवढा ग्राहकवर्ग मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक हतबल झाले आहेत. कामगार, वीजबिल, दुकान भाडे हाच खर्च अधिक आहे. पूर्ण क्षमतेने हॉटेल व फास्टफूड, वडापावसारखे व्यवसाय सुरू करण्यास शासनाने परवानगी द्यावी. 
- इम्रान सगरी, छोटू कोल्हापुरी वडापाव 
 

सकारात्मक निर्णय घ्यावा

हॉटेल चालकांना दिलासा देण्यासाठी घरपोच सेवा सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. घरपोच सेवा देणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊ लागल्या आहेत. त्यांनी कमिशनमध्ये वाढ केल्याने हॉटेलचालकांचा जवळपास सर्वच नफा या कंपन्यांच्या घशात जाऊ लागला आहे. हॉटेलचालकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा. 
- विनायक परदेसी, रसिक डायनिंग हॉल, सोलापूर 

चांगला प्रतिसाद

कोरोनाच्या निमित्ताने आलेले संकट सर्वच व्यवसायासाठी नुकसानदायक आहे. कोरोनाच्या संकटामुळे हॉटेल व्यवसायावर गंडांतर आले आहे. जिल्हा प्रशासनाने पार्सल आणि होम डिलिव्हरीसाठी परवानगी दिल्यानंतर आम्ही आमच्यातील पदार्थ खवय्यांपर्यंत नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून घरपोच देण्यास सुरवात केली आहे. आम्हाला होम डिलिव्हरीमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
- राहुल कटारे, करिम्स रेस्टॉरंट, होटगी रोड, सोलापूर 

कोरोनाबद्दलची भीती कायम

ग्राहकांच्या मनात अद्यापही कोरोनाबद्दलची भीती कायम आहे. हॉटेल व हॉटेलचा परिसर रोज निर्जंतुक करूनही होम डिलिव्हरी व पार्सल सेवेला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. या व्यवसायासाठी केलेल्या गुंतवणुकीच्या तुलनेत व सध्या हॉटेल सुरू ठेवण्यासाठी होत असलेल्या खर्चाच्या तुलनेत येणारी मिळकत यामध्ये कमालीचा फरक पडत आहे. 
- संजय गौडनवरू, हॉटेल जय पॅलेस 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hotel business declines by 95% in parcels, home delivery