
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज...
सोलापूर : कोरोनाच्या संक्रमणाची स्टेज खंडीत होऊन त्या विषाणूला देशातून ब्लॅक आऊट करण्यासाठी उद्या (रविवारी) जनता कर्फ्यू लागू होणार आहे. जनता कर्फ्यू म्हणजे केअर फॉर यु होय. कोरोना या विषाणूजन्य आजारावर नेमके औषध उपलब्ध नसल्याने नागरिकांनी गर्दी टाळणे, विनाकारण घराबाहेर न जाणे, गर्दीचे कार्यक्रम टाळणे, हेच ठोस उपाय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले, रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदिप हिरडे यांनी केले आहे.
हेही नक्की वाचा : जनता कर्फ्यू ! विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच
गर्दी टाळा, स्वच्छता राखा
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी हाच एकमेव सध्या उपाय आहे. जनतेने स्वत:हून गर्दी टाळावी, हात वारंवार धुवावेत. जनतेच्या हितासाठी जिल्हा प्रशासनाने विविध आदेश काढले आहेत. या आदेशांचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांची एकजूट महत्वाची आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. आरोग्य, पोलिस, महसूल, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन, उपप्रादेशिक परिवहन विभाग यासह सर्वच विभागाच्यावतीने विविध उपाय योजना केल्या जात आहे. प्रशासनाला सहकार्य करून कोरोनाचा संसर्ग टाळण्यात आपण यशस्वी होऊ. आफवा पसरविणाऱ्यांवर, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाचे लक्ष आहे. आफवांवर विश्वास ठेवू नका, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासह प्रशासनाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर
हेही नक्की वाचा : कोरोनामुळे सिग्नल यंत्रणेला ब्रेक
नागरिकांसाठी आरोग्य यंत्रणा सक्षम
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर- जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाने ठोस नियोजन केले आहे. महापालिका, जिल्हा परिषद, सर्वोपचार रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमधील डॉक्टर, कर्मचारी अहोरात्र परिश्रम करीत आहेत. परदेशातून भारतात येणारे प्रवासी आणि त्यांच्या संपर्कातील लोकांवर आता सर्वाधिक फोकस केला जात आहे. तसेच नागरिकांनी गर्दीत जाणे टाळल्यास आणि सार्वजनिक कार्यक्रमांना काही दिवस आवर घातल्यास निश्चितपणे कोरोना या विषाणूच्या संक्रमणाची स्टेज खंडीत होईल. त्यानंतर काही दिवसांतच त्याचा सकारात्मक परिणाम पहायला मिळेल आणि कोरोना देशातून हद्दपार झालेला दिसेल. त्यामुळे सोलापूर शहर- जिल्ह्यातील नागरिकांनी या ब्लॅक आऊटला प्रतिसाद द्यावा.
- डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर
हेही नक्की वाचा : कोरोनाची अफवा पडली महागात ! अमरसिंग राठोड जेरबंद
जनता कर्फ्यू म्हणजे केअर फॉर यु
जनता कर्फ्यू हा नागरिकांच्या काळजीसाठीच असून त्याला सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित आहे. गर्दीच्या ठिकाणी कोरोना या विषाणूचा संसर्ग वाढतो आहे. त्यामुळे उद्या (रविवारी) आयोजित केलेल्या जनता कर्फ्यूमध्ये सर्वांनी सहभागी होऊन घरातच थांबावे. विनाकारण घराबाहेर येणे टाळावे, जेणेकरुन कोरोना या विषाणूला बाहेर इतरत्र संक्रमण करायला संधी मिळणार नाही. त्यामुळे काही दिवसांत निश्चितपणे कोरोनाचे देशावरील संकट हद्दपार होईल. कोरोना या विषाणूला हद्दपार करण्याच्या निमित्ताने आयोजित या ब्लॅक आऊटला सोलापूर शहर- जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे. सोलापूर शहरातील ठिकठिकाणी विलगीकरण व अलगीकरण कक्ष सुरु करण्यात आलेले आहेत. सोलापुरकरांनी आरोग्य विभागाला केलेल्या सहकार्यामुळेच नागरिकांनी सोलापुरात अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.
- डॉ. संतोष नवले, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका
हेही नक्की वाचा : भाजप खासदारांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
रेल्वे प्रवाशांची नियमित थर्मल स्क्रिनिंग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या (रविवारी) जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तो प्रशासकीय निर्णय नसून कोरोना या विषाणूला देशातून हद्दपार करण्याच्या हेतूने जनतेची काळजी म्हणून घेतलेला निर्णय आहे. देशातील सर्वच राज्ये राजकीय हेवेदावे बाजूला सारुन या जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांनी निष्कारण घराबाहेर पडू नये. प्रवाशांची सुरक्षितता म्हणून रविवारी निघणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गर्दीच्या माध्यमातून कोरोना या विषाणूचे संक्रमण होत असल्याने केंद्र सरकारने जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. त्याचे सर्व नागरिकांनी, रेल्वे प्रवाशांनी पालन करणे अपेक्षित आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार सर्वांनी त्याचे तंतोतंत पालन केल्यास काही दिवसांतच कोरोना हा विषाणू देशातून हद्दपार झालेला दिसेल.
- प्रदिप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे