Corona
Corona

महापालिकेसाठी ग्रामीणची मदत घ्या, पण सोलापूरचा मृत्यूदर कमी करा 

सोलापूर : शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा डाटा भरताना काळजी घ्या. जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. विडी, वस्त्रोद्योग क्षेत्रातील कामगारांची संपूर्ण माहिती वय, आजारासह गोळा करा. तंबाखू आणि टेक्‍स्टाईलचा रुग्णांवर काय परिणाम होतोय का? मृत्यूची कारणे काय? याबाबत संशोधन करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाने मिशन मोडवर काम करावे. शहरात लोकसंख्या जास्त असल्याने मनुष्यबळ कमी पडत असेल तर ग्रामीण टीमसोबत सर्वेक्षण तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचनाही डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या. 

खरीप हंगाम, पीक कर्ज वाटप आणि कोरोनाच्या स्थितीचा आढावा डॉ. म्हैसेकर यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. त्याप्रसंगी त्यांनी या सूचना केल्या. या वेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, राष्ट्रीय बॅंकांचे प्रतिनिधी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे यांच्यासह संबंधित विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

डॉ. म्हैसेकर म्हणाले, जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बॅंकांनी खरीप हंगामात शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, यात कर्जमाफी न झालेल्या व झालेल्या सर्वांचा समावेश करा. काही बॅंका कर्ज देत नसतील तर यात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. श्री. कोथमिरे यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची स्थिती सांगितली. निधी नसल्याने नाबार्डकडे मागणी केली असून नियमित कर्ज भरणाऱ्यांना पुन्हा कर्ज देत असून आतापर्यंत 59 टक्के पीक कर्ज वाटप झाल्याचे सांगितले. 

कोरोनामुळे 53 विडी कामगार, 30 टेक्‍स्टाईल कामगारांचा मृत्यू 
जिल्ह्यात आतापर्यंत 1897 कोरोना रुग्ण असून यातील 971 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 772 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात 170 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून यात शहरातील 159 तर 11 ग्रामीण रुग्णांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी या बैठकीत दिली. मृत पावलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 53 विडी कामगार तर 30 टेक्‍स्टाईल कामगार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी दिली. सोलापूर शहरासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्याचा मुद्दा महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी उपस्थित केला. ग्रामीण टीमसह नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या साहाय्याने शहरातील सर्वेक्षणाचे काम करा, सध्या शरीराच्या तापमानाबरोबर पल्स रेट, एक्‍स-रे, रक्तदाब यांचीही तपासणी करा, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com