सोलापूर स्थानकातून आजपासून आंतरराज्य बसफेऱ्या 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

लॉकडाउन सुरू झाल्यापासून ही आंतरराज्य बससेवा पुर्णपणे बंद होती. त्यानंतर सुरुवातीला जिल्हा अंतर्गत व नंतर ता. 1 सप्टेंबरपासून आंतरजिल्हा बससेवा सुरू करण्यात आली होती. मात्र सोलापूर हे शहर इतर राज्याच्या सीमेवर असल्याने आंतरराज्य बस सेवा सुरू करणे आवश्‍यक ठरले होते.

सोलापूर : राज्य परिवहन मंडळाच्या सोलापूर विभागाकडून बुधवार (ता.16) पासून आंतरराज्य बस सेवा सुरू होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना लगतच्या आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यामध्ये प्रवास करता येणार आहे. 
लॉकडाउन सुरू झाल्यापासून ही आंतरराज्य बससेवा पुर्णपणे बंद होती. त्यानंतर सुरुवातीला जिल्हा अंतर्गत व नंतर ता. 1 सप्टेंबरपासून आंतरजिल्हा बससेवा सुरू करण्यात आली होती. मात्र सोलापूर हे शहर इतर राज्याच्या सीमेवर असल्याने आंतरराज्य बस सेवा सुरू करणे आवश्‍यक ठरले होते. सोलापूर विभागाला या सेवेपासून चांगले आर्थिक उत्पन्न होते. या बसफेऱ्यांमध्ये साठ टक्के भारमान असल्याने चांगले उत्पन्न सोलापूर एसटी विभागाला होते. आंतरराज्य वाहतुकीसाठी लॉकडाउनपूर्वी 43 बस फेऱ्या केल्या जात होत्या. यामध्ये आरक्षण सेवा घेऊन परराज्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या चांगली आहे. सर्वात अधिक प्रतिसाद हैद्राबाद व अफलजपूर या दोन बसफेऱ्यांना असतो. त्या नंतर कर्नाटक व आंध्रप्रदेशातील इतर शहरांना जोडणाऱ्या बसफेऱ्यांचा समावेश आहे. 
जिल्ह्यातून बुधवारी (ता.16) रोजी तीन बसफेऱ्या सुरु होत आहेत. अक्कलकोट-अफजलपूर ही बस सेवा सकाळी साडेदहा व दुपारी अडीच वाजता बसफेरी सोडली जाईल. अफजलपूर येथून अक्कलकोटसाठी दुपारी साडेबारा वाजता व सायंकाळी साडेचार वाजता बस निघणार आहे. सोलापूर ते हैद्राबाद ही बस सकाळी सात, साडेबारा व दुपारी तीन वाजता जाणार आहे. हैद्राबाद येथून सोलापूरसाठी सकाळी सहा, रात्री साडेनऊ व रात्री साडेअकरा वाजता बस निघेल. पहिल्या टप्प्यात या तीन बसफेऱ्या सुरू झाल्यानंतर लगेच इतर आंतरराज्य बसफेऱ्या सुरू केल्या जातील असे सूत्रांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inter-state buses from Solapur station from today