बांधावरच्या शेतमालाला ते दाखवतायतं सोन्याचे दिवस, भालेवाडीतील तरुण काबिज करु लागले महाराष्ट्रा बाहेरची बाजारपेठ 

प्रमोद बोडके
Friday, 25 September 2020

करमाळा तालुक्‍यातील चेन्नईच्या बाजारपेठेत पाठविण्याची तयारी झाली आहे. ज्यावेळी कांद्याला दर नसतो त्यावेळी कांदा साठवून ठेवण्यासाठी एक हजार टनाची कांदा चाळ उभारण्याचे आमचे नियोजन आहे. या शिवाय येत्या काळात सर्व प्रकारच्या कडधान्याचा पुरवठा केला जाणार आहे. गहू आणि ज्वारी धान्याच्या स्वरुपात व पिठाच्या स्वरुपात पाच किलो पॅकिंगमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. 
- शशिकांत पवार, अध्यक्ष, कमला भवानी प्रसन्न शेतकरी उत्पादक कंपनी 

सोलापूर : बाजारात ज्या वेळी भाव असतो त्यावेळी विकायला शेतात माल नसतो आणि ज्यावेळी शेतात भरपूर पिकते त्यावेळी बाजारात भाव नसतो. काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी हे दुष्टचक्र कायमच असते. शेतकऱ्याचा माल स्वस्तात विकतो. ग्राहकांना मात्र, आहे त्याच दरात खरेदी करावा लागतो. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोन्हीही संतुष्ठ होत नाहीत. भालेवाडीतील (ता. करमाळा) कमला भवानी प्रसन्न शेतकरी उत्पादक कंपनीने या दुष्टचक्रातून मार्ग काढला आहे. बांधावरच्या शेतमालाला या कंपनीमुळे सोन्याचे दिवस येऊ लागले आहेत. 

2015 मध्ये दहा जणांनी प्रत्येकी दहा हजार रुपयांचे भांडवल स्थापन केलेल्या कमला भवानी प्रसन्न शेतकरी उत्पादक कंपनीची आज वार्षिक उलाढाल एक ते दिड कोटींच्या घरात गेली आहे. शेतीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंची एकत्रित खरेदी होत असल्याने आणि शेतमालाची विक्रीही कंपनीच्या माध्यमातून एकत्रितपणे होत असल्याने वाहतूकीचा खर्च, वेळेच्या बचतीचा लाभ सर्वांनाच मिळत आहे. तरकारी विक्रीपासून सुरू झालेला कंपनीचा व्यवसाय आता मका, कांदा, उडीद खरेदी-विक्रीपर्यंत पोहोचला आहे. करमाळा परिसरात पिकणाऱ्या कांद्याला कंपनीमुळे चेन्नईची हक्काची बाजारपेठ मिळाली आहे. 

कांदा खरेदी आणि विक्रीनंतर कंपनीने परिसरातील शेतकऱ्यांकडून मका खरेदीला सुरवात केली. करमाळ्याची मका पुणे जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांपर्यंत पोहोचू लागली. पोल्ट्री व्यावसायिकांना चांगल्या दर्जाची मका, माफक दरात मिळू लागल्याने कमला भवानी प्रसन्न शेतकरी उत्पादक कंपनीने पुणे जिल्ह्याच्या पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये आपली विश्‍वासार्हता निर्माण केली आहे. ही बाजारपेठ मिळविताना "सकाळ' माध्यम समूहातील दैनिक "ऍग्रोवन'ची मोठी मदत झाल्याची कबूलीही शशिकांत पवार यांनी दिली. उडीद खरेदीतही कंपनीने पदार्पण केले आहे. येत्या काळात करमाळा तालुक्‍यानंतर आता शेजारच्याही तालुक्‍यात कंपनीचा विस्तार करण्याचे नियोजन आखण्यात येत आहे. 

आकडे बोलतात... 
स्थापनेवेळी भांडवल : एक लाख 
सध्याची वार्षिक उलाढाल : एक कोटी ते दीड कोटी 
कंपनीची सभासद संख्या : 375 
कंपनीसोबत जोडलेले शेतकरी : 1 हजार 
कंपनीचे संचालक : 10 

हैदराबाद, गुजरातमधून घेतले प्रशिक्षण 
कंपनी स्थापन झाल्यानंतर या व्यवसायत उतरलेल्या पवार यांनी या व्यवसायासाठी आवश्‍यक असलेली कौशल्ये व ज्ञान मिळविले आहे. हैदराबाद येथील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ऍग्रीकल्चर एक्‍सटेंशन मॅनेजमेंट संस्थेतून ऍग्री बिझनेस सप्लाय चैन मॅनेजमेंटचे सहा दिवसांचे प्रशिक्षण घेतले आहे. दूध व्यवसायासंदर्भातील कौशल्ये व ज्ञान मिळविण्यासाठी पवार यांनी गुजरातमधील आनंद येथून अमूल डेअरीमधून आठ दिवसांचे प्रशिक्षण घेतले आहे. या कौशल्याचा आणि ज्ञानाचा उपयोग कंपनीच्या विस्तारासाठी होत आहे. 

लॉकडाउनने दिली व्यवसायाची दृष्टी 
कोरोनाला रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाउनने अनेकांचे व्यवसाय आणि अर्थकारण ठप्प केले. या लॉकडाउने आम्हाला व्यवसायाची नवी दृष्टी दिल्याची कबूली कमला भवानी प्रसन्न शेतकरी उत्पादक कंपनीच्या शशिकांत पवार यांनी व्यक्त केली. लॉकडाउन कालावधीत कंपनीच्यावतीने पुण्यातील सात नामांकित सोसाट्यांमध्ये भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात आला. आठवडे बाजार बंद झाल्याने शेतकऱ्यांनी त्यांचा भाजीपाला फेकून देण्याची तयारी ठेवली होती. कंपनीमुळे या भाजीपाल्याला लॉकडाउन कालावधीत बाजारपेठ मिळाली आणि ग्राहकांना थेट बांधावरचा शेतमाल पुण्यात मिळाला. ग्राहकांची नेमकी गरज काय आहे? कोणत्या वस्तूंचा आणि कशा स्वरुपात पुरवठा केल्यास ग्राहक माल घेतात याचा अंदाज आम्हाला आल्याचेही त्यांनी सांगितले. 

इथे साधा संपर्क 
समाजात विविध क्षेत्रात असलेल्या कोणत्याही समस्यांवर ठोस उपाय शोधून सोलापूर शहर व जिल्ह्यातील ज्या कोणी स्टार्टअप सुरु केले आहे. त्यांनी 9921873895 किंवा 9921032700 या क्रमांकावर संपर्क साधावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It shows the agricultural products on the dam, the golden days, the youth of Bhalewadi started capturing the market outside Maharashtra