शिवसेनेचा कोणता जिल्हाप्रमुख स्ट्रॉंग? जिल्ह्यातील 587 ग्रामपंचायतींच्या निकालाकडे लागले लक्ष 

Shiv Sena
Shiv Sena

सोलापूर : जिल्ह्यात शिवसेनेचे चार जिल्हाप्रमुख असून, त्यात धनंजय डिकोळे, गणेश वानकर, पुरुषोत्तम बरडे आणि संभाजी शिंदे यांचा समावेश आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील तालुक्‍यातील तथा विधानसभा मतदारसंघातील किती ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकणार, यातून पक्षातील स्ट्रॉंग जिल्हाप्रमुख ठरणार आहे. त्याचा फैसला आज (सोमवारी) मतमोजणीनंतर होईल. 

जिल्ह्यातील 658 पैकी 65 ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. 593 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान झाले असून आज (ता. 18) मतमोजणी होणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेने संपर्कमंत्री म्हणून गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांची नियुक्‍ती केली आहे. त्यांनी सोलापुरातील शिवसेना भवनात जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांची बैठक घेतली होती. तर जिल्हा प्रमुखांनीही आमदार, माजी आमदारांसह पक्षातील पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रचार केला. भाजप हा आमच्यामुळेच ग्रामीण भागात पोचला आणि आमच्यामुळेच त्यांचे आमदार निवडून आले, हा दावा कितपत खरा की खोटा याचाही अंदाज मतमोजणीनंतर येणार आहे. दरम्यान, जिल्हाप्रमुख डिकोळे यांच्याकडे माढा व करमाळा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी असून या मतदारसंघातील 133 ग्रामपंचायती, संभाजी शिंदे यांच्याकडील पंढरपूर, सांगोला व माळशिरस या तालुक्‍यातील 190 ग्रामपंचायती, बरडे यांच्याकडील अक्‍कलकोट व दक्षिण सोलापुरातील 120 आणि वानकर यांच्याकडील मोहोळ, उत्तर सोलापूर, बार्शी आणि मंगळवेढा या तालुक्‍यातील सर्वाधिक 215 ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी होत आहे. बिनविरोध ग्रामपंचायती सोडून अन्य ग्रामपंचायतींवर कोणत्या जिल्हाप्रमुखांचे वर्चस्व राहणार, याची उत्सुकता लागली आहे. 

सदस्यांपेक्षा सरंपच कोण, याचीच उत्सुकता 
ग्रामपंचायत निवडणुकीच्या या टप्प्यात तब्बल 658 ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. त्यातील 65 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून उर्वरित ग्रामपंचायतींचा निकाल आज (सोमवारी) स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी, ग्रामपंचायत निहाय आरक्षण काढण्यात आले आहे. आता प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे आरक्षण जिल्हाधिकारी जाहीर करणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण 25 ते 30 जानेवारीदरम्यान काढले जाईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. परंतु, ग्रामपंचायतीत कोणत्या गटाचे किती सदस्य, सर्वाधिक सदस्य कोणाचे, यापेक्षा सरपंच कोण, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com