'या' ग्रामस्थांनी दाखवून दिले "गाव करेल ते राव काय करेल'! 

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 28 जून 2020

कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांना आपले काम गमावून घरी बसावे लागले आहे. बेकारी वाढली असून बेरोजगार तरुण व्यसनांकडे आकर्षित होत आहेत. जामगावच्या सरपंच अनिता डांगे, ग्रामपंचायत सदस्य व पोलिस पाटील शंकर पाटील यांनी गावातील दारू बंद करण्याचा निर्णय घेऊन 18 मे रोजी ग्रामपंचायतीत दारूबंदीचा ठराव मंजूर करून घेतला. 

कोरवली (सोलापूर) : जामगाव (ता. मोहोळ) येथे गेल्या महिनाभरात अवैध दारू विक्रीवर धडक कारवाई करून अखेर गावातील दारूची विक्री पूर्णपणे थांबवण्यात महिला सरपंचासह ग्रामस्थांना यश आले आहे. कामती पोलिस ठाण्याच्या मदतीने ही कामगिरी यशस्वी झाली. 

हेही वाचा : अरेरे..! लग्नसराईने दिली "यांना' हुलकावणी : वाचा सविस्तर 

तीन महिन्यांपासून कोरोनाच्या उपाययोजना करण्यात ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच, उपसरपंच, सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष, ग्रामस्थ व्यस्त असताना, अवैध दारू विक्री हे मोठे आव्हान होते. "गाव करेल ते राव काय करेल' हे ग्रामस्थांनी दारूबंदी करून दाखवून दिले आहे. 

कोरोना महामारीमुळे अनेकांना आपले काम गमावून घरी बसावे लागले आहे. बेकारी वाढली असून बेरोजगार तरुण व्यसनांकडे आकर्षित होत आहेत. सरपंच अनिता डांगे, ग्रामपंचायत सदस्य व पोलिस पाटील शंकर पाटील यांनी गावातील दारू बंद करण्याचा निर्णय घेऊन 18 मे रोजी ग्रामपंचायतीत दारूबंदीचा ठराव मंजूर करून घेतला. पुढे तो ठराव राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर व कामती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांच्याकडे देण्यात आला. 

हेही वाचा : बापरे..! प्रचंड नुकसानीमुळे होत आहे "या' कंपन्यांमध्ये कामगार कपात 

20 मे रोजी पंढरपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरीक्षक एस. एम. मस्करे, कामती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण उंदरे, हेड कॉन्स्टेबल दुधे, अमोल नाईकवाडे, पोलिस कॉन्स्टेबल संदीप काळे यांनी जामगाव बुद्रूक येथील दारू अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत तीन दुचाकी, हातभट्टीचे चार ट्यूब असा एकूण दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. 
या कारवाईनंतर सहायक पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांनी सलग एक महिना कारवाई सुरू ठेवली. त्यामुळे गावात दारू विक्री पूर्णपणे बंद झाली. दारूबंदीसाठी गावातील पोलिस पाटील शंकर पाटील, नामदेव डांगे, उपसरपंच रमेश ढवले, माजी सरपंच दत्तात्रय मेटकरी, नागराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गायकवाड, हारून शेख, अर्जुन डांगे, दाजी पाटील, तंटामुक्त अध्यक्ष विजयकुमार पाटील व ग्रामस्थांनी सहकार्य केले. 

दारूबंदीमुळे शांतता निर्माण होईल 
गावाच्या विकासकामांबरोबर गावातील दारूबंदी करणे हे देखील एक आव्हान होते. मात्र, ग्रामस्थ आणि पोलिसांच्या सहकार्यामुळे ते करणे शक्‍य झाले. दारूबंदीमुळे गावात शांतता निर्माण होईल. 
- अनिता डांगे, 
सरपंच, जामगाव बुद्रूक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jamgaon villagers and police took action and stopped selling liquor