
खोटी माहिती देऊन लोकांची फसवणूक करून अवैधरीत्या 25 लाख रुपये किमतीच्या दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापांची विक्री करणाऱ्या टोळीवर कवठे महांकाळ (जि. सांगली) पोलिसांनी केलेल्या कारवाईत मंगळवेढ्यातील तिघांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवेढा (सोलापूर) : खोटी माहिती देऊन लोकांची फसवणूक करून अवैधरीत्या 25 लाख रुपये किमतीच्या दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापांची विक्री करणाऱ्या टोळीवर कवठे महांकाळ (जि. सांगली) पोलिसांनी केलेल्या कारवाईत मंगळवेढ्यातील तिघांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत मंगळवेढ्यातील संशयित आरोपींची नावे समोर आल्याने व त्यांना अटक करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी, की कवठे महांकाळ शहराच्या जवळ असलेल्या मेघराज मंदिराजवळ दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी टोळी येणार असल्याची खबर कवठे महांकाळच्या पोलिसांना मिळाली. त्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक अप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल कोलंबीकर, शिवाजी करे, दीपक गायकवाड, संजय चव्हाण, अण्णासाहेब भोसले, प्रशांत मोहिते, चंद्रसिंग साबळे, वनपाल आर. आर. चौगुले, वनरक्षक डी. एस. बजबळकर यांनी सापळा लावला असता त्यात मंगळवेढा तालुक्यातील तिघे, कोल्हापूरचे दोघे, बेळगाव एक असे सहाजण अडकले. त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्या जवळील नायलॉन वायरच्या पिशवीत तीन मांडूळ जातीचे साप आढळून आले.
पोलिसांनी गजानन वसंत सरगर, संजय अशोक ओलेकर, तिपण्णा म्हाळाप्पा तडकळे (रा. सलगर खु, ता. मंगळवेढा), महादेव मनोहर बेनाडे, युवराज दत्तात्रय मकदूम (रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर), वाहन चालक विवेक राजेद्र बेनाडे (रा. डोणेवाडी, जि. बेळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मंगळवेढा तालुक्यात मांडुळाचे तस्करी करणारी टोळी कार्यरत असल्याची चर्चा सुरू असून या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
महाराष्ट्र