लाड म्हणाले, गेल्यावेळी आमच्याकडून चूकच झाली, आता पुणे पदवीधरमध्ये होणार नाही बंडखोरी 

प्रमोद बोडके
Tuesday, 10 November 2020

नाराजी दूर करण्यासाठी कमी पडले प्रयत्न 
गेल्या वेळी विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केली. आम्ही बंडखोरी केल्यानंतर आमची नाराजी दूर करण्यासाठी त्यावेळी पक्षाच्यावतीनेही प्रयत्न कमी पडले. नंतरच्या काळात आमची नाराजी दूर झाल्याची माहिती निरीक्षक लाड यांनी यावेळी दिली. 

सोलापूर : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात मागील निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सारंग पाटील यांच्या विरोधात आम्ही केलेली बंडखोरी ही आमच्याकडून चूकच झाली. या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला. यंदाच्या पदवीधर निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंडखोरी होणार नाही असा विश्‍वास पुणे पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार अरुण लाड यांचे चिरंजीव तथा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे निरीक्षक शरद लाड यांनी आज व्यक्त केला. 

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या तालुका अध्यक्ष, जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारणीसाठी इच्छुकांच्या मुलाखती आज झाल्या. या मुलाखती घेण्यासाठी निरीक्षक लाड आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. या बैठकीनंतर त्यांनी रामलाल चौकातील राष्ट्रवादी भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, प्रदेश सचिव अरुण आसबे, श्रीकांत शिंदे, प्रशांत बाबर उपस्थित होते.

निरीक्षक लाड म्हणाले, या बंडखोरीमुळे सारंग पाटील यांचा त्या निवडणुकीत पराभव झाला. आता आमचे आणि सारंग पाटील व खासदार श्रीनिवास पाटील यांच्यातील संबंध चांगले झाले आहेत. पश्‍चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीला कॉंग्रेसची साथ मिळत होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्याने या निवडणुकीत कॉंग्रेससोबतच शिवसेनेचीही ताकदही राष्ट्रवादीला मिळाली आहे. यंदाच्या निवडणुकीत पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची उमेदवारी कोणालाही मिळो, पक्षाचा उमेदवार म्हणून आम्ही त्यांना विजयी करु असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lad said, last time we made a mistake, now there will be no revolt among Pune graduates