"रॉबिनहूड'तर्फे "बॅग ऑफ होप' वाटपास प्रारंभ; 15 ऑगस्टपर्यंत चालणार उपक्रम 

Bag of Hope
Bag of Hope

सोलापूर : कोरोनाच्या संकटामुळे अनेक लोक अडचणीत आहेत. त्यांना आता खरी मदतीची गरज आहे, हे लक्षात घेऊन रॉबिनहूड आर्मीने सोलापुरात अगदी पेस्ट, साबणापासून अन्नधान्य व औषधांसह एक किट करून "बॅग ऑफ होप' हा उपक्रम सुरू केला आहे. 15 ऑगस्टपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सोलापूरचे रॉबिनहूड आर्मीचे प्रमुख प्रा. हिंदुराव गोरे यांनी सांगितले. 

शहरात आतापर्यंत दीड लाख निराधार, ज्येष्ठ नागरिक, कामगार व कुष्ठरुग्णांना तीन चपाती, भाजी, चटणी व गोड पदार्थ असे रोज अन्नदान करणाऱ्या रॉबिनहूड आर्मीतर्फे "बॅग ऑफ होप' हा उपक्रम राबविला जात आहे. त्याची सुरवात आज (शनिवारी) करण्यात आली. "बॅग ऑफ होप'मध्ये गहू, तांदूळ, डाळ, साखर, चहा, तेल, बिस्किट, चिक्की, सॅनिटरी नॅपकिन, अर्सेनिक अल्बम गोळ्या, पोहे, रवा, अंगाचा आणि कपड्याचा साबण, मीठ, टूथब्रश आणि पेस्ट व रॉबिनहूड आर्मीचे मास्क असे साहित्य आहेत. या वेळी प्रा. हिंदुराव गोरे, प्रा. अनिकेत चनशेट्टी, प्रा. संदीप लिगाडे, प्रा. संजीव म्हमाणे, सुभाष कुरले, आयेशा शेख, प्रेम भोगडे, सौरभ सिंदगी, आकाश मुस्तारे, कृष्णा थोरात, संप्रित कुलकर्णी, पंकज वाघमोडे, विघ्नेश माने, समर्थ उबाळे, विवेक नवले, मनीष हिरासकर, गोपाळ नाडीगोटू, अमोल गुंड आदी उपस्थित होते. 

सलग चौथ्या वर्षी उपक्रम 
सलग चौथ्या वर्षी रॉबिनहूड आर्मी, सोलापूरच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कोरोनाच्या संकटामध्ये लॉकडाउनच्या काळात अन्न, अन्नधान्य व ज्येष्ठ नागरिकांना मदत पोचवणे अशा विविध उपक्रमांतून एकूण शहरात दोन लाख तर जिल्ह्यामध्ये पाच लाख गरजू लोकांना घरपोच मदत पोचवली असून, आतापर्यंत मागील चार वर्षामध्ये शहरात कोणताही आर्थिक व्यवहार न करता सुमारे चार लाख गरजूंना मदत करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्य दिनानिमित्त केवळ एक दिवस मदत न पोचविता लॉकडाउनच्या संकटामुळे सलग 45 दिवस बॅग ऑफ होप या उपक्रमांतर्गत गरजूंना घरपोच मदत देण्यात येणार असल्याची माहिती प्रा. गोरे यांनी दिली. 

रॉबिनहूड आर्मीचे कार्य हे महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सातारा आदी जिल्ह्यांमध्ये सुरू असून सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर, अक्कलकोट, मोहोळ, सांगोला व बार्शी या शहरांमध्ये सुरू आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अनिकेत चनशेट्टी, प्रा. संदीप लिगाडे, प्रा. संजीव म्हमाणे, अपूर्व जाधव आदींसह रॉबिनहूड आर्मीचे स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत. 

महाराष्ट्र 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com