
महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज या विचारांचा वारसा महाराष्ट्रभर नेण्यासाठी बहुजन रयत परिषद या संघटनेची स्थापना केली. पक्षात राहून संघटनेची केलेली स्थापना काहींच्या नजरेस पडल्यानंतर त्याचा माजी मंत्री ढोबळे यांना त्रास सोसावा लागला. परंतु, त्यांनी हा त्रास सोसतच संघटनेचा कार्य विस्तार महाराष्ट्रात नेला.
मंगळवेढा (सोलापूर) : भाजपात प्रवेश केलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी स्थापन केलेल्या बहुजन रयत परिषद या संघटनेची सूत्रे त्यांनी आपली कन्या कोमल ढोबळे - साळुंखे यांच्यावर सोपविली असून, संघटनेच्या माध्यमातून त्या सक्रिय झाल्या आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे शिष्य म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मण ढोबळे यांनी मंगळवेढा, मोहोळ या विधानसभा मतदारसंघातून वीस वर्षे प्रतिनिधित्व केले. शरद पवारांनी त्यांना मंत्रिपदाची संधी दिली. मोहोळ राखीव मतदारसंघातून आमदार झाल्यानंतर पालकमंत्री पदाची संधीही दिली. परंतु, गत पाच वर्षांनंतर त्यांनी पक्ष नेतृत्वावर तोफ डागत पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपचा आश्रय घेतला.
गेल्या पाच वर्षांपासून त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत परिचारक व दिवंगत आमदार भारत भालके, संत दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे या गटांचा आश्रय घेतला. परंतु लक्ष्मण ढोबळे यांनी महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज या विचारांचा वारसा महाराष्ट्रभर नेण्यासाठी बहुजन रयत परिषद या संघटनेची स्थापना केली. पक्षात राहून संघटनेची केलेली स्थापना काहींच्या नजरेस पडल्यानंतर त्याचा माजी मंत्री ढोबळे यांना त्रास सोसावा लागला. परंतु, त्यांनी हा त्रास सोसतच संघटनेचा कार्य विस्तार महाराष्ट्रात नेला. या संघटनेचे कार्य पुढे चालू ठेवावे या दृष्टीने त्याची जबाबदारी आता श्री. ढोबळे यांनी त्यांची कन्या कोमल ढोबळे - साळुंखे यांच्यावर सोपवली.
कोमल ढोबळे - साळुंखे या सध्या सावली फाउंडेशनच्या माध्यमातून महिला बचत गट व विविध महिलांविषयक कार्यक्रमांच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होत्या. आता त्यांच्यावर या संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. माजी मंत्री ढोबळे यांचे राजकीय वारसदार अभिजित ढोबळे हे चपळगाव (ता. अक्कलकोट) येथून जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी झाले होते; परंतु त्यानंतर राजकारणात त्यांना अधिकचा प्रभाव टाकता आला नाही. त्यामुळे कोमल ढोबळे - साळुंखे यांना दिलेली संधी या संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करण्यासाठी फायदेशीर ठरणार का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल