लॉकडाऊनमुळे मिळतोय अंगभूत कलागुणांना वाव 

सूर्यकांत बनकर 
Saturday, 25 April 2020

अभ्यास करून चित्र रेखाटन 
मला लहानपणापासूनच चित्रकलेची खूप आवड आहे. मला या क्षेत्रात खूप मोठे करिअर करायचे आहे. पण मी सध्या बीएससी ऍग्रीचे शेवटच्या वर्षात शिकत असल्याने चित्रकलेसाठी वेळ देणे शक्‍य होत नव्हते. पण सध्या लॉकडाऊनमुळे भरपूर वेळ आहे. माझा नियमित अभ्यास करुन राहिलेल्या वेळेत मी चित्रे रेखाटत व त्यात रंग भरत बसते. 
- मयुरी रेपाळ 

करकंब (जि. सोलापूर) : लॉकडाऊनचा कालावधी आता एक महिन्यापेक्षा जास्त झाला आहे. तो अजून किती वाढेल हेही सांगता येत नाही. परिणामी घरात बसून मिळालेल्या भरपूर रिकाम्या वेळेचा अनेक जण चांगला उपयोग करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे नोकरी, शिक्षण, व्यवसाय सांभाळताना आपल्यातील कलागुण जोपासता येत नसलेल्यासांठी हा काळ सुवर्णकाळच ठरला आहे. 
लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात अनेकांना घरात थांबणे म्हणजे शिक्षा झाल्यासारखेच वाटत होते. पण नंतरच्या काळात त्याची अपरिहार्यता वाढत गेली आणि जो-तो वेळ घालविण्यासाठी आपापला अंगभूत छंद जोपासू लागल्याचे चित्र निर्माण झाले. यातूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारांचे अदानप्रदान होवू लागले. त्यातून समविचारी व्यक्तींचे स्वतंत्र ग्रुप तयार होवून मोठ्या प्रमाणात विचारमंथनही होवू लागले. यामध्ये चित्रकला, जुनी-नवी गाणी, वाचन, पर्यावरण, स्पर्धा परीक्षा तयारी, शब्दकोडी, कूटप्रश्न, ऑनलाईन वकृत्व स्पर्धा, ऑनलाईन स्वरचीत कविता गायन स्पर्धा, ऑनलाईन टेस्ट, विद्यार्थ्यांचे अभ्यास आदींसाठी स्वतंत्र ग्रुप तयार करुन त्यावर दररोज मोठ्याप्रमाणात 'शेअरिंग' होत आहे. विशेष करुन प्राथमिक शिक्षकांची जास्त असणारी संख्या आणि त्यांना मिळालेला भरपूर रिकामा वेळ यामुळे त्यांच्यामध्ये वाचनाचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. शिवाय वाचलेल्या नवीन पुस्तकाबद्दल सोशल मीडियातून चर्चेचे अदान-प्रदान होत असून त्यातूनही अनेकांना वाचनाची प्रेरणा मिळत आहे. पालकांनाही मुलांसाठी भरपूर वेळ मिळत असल्याने स्वतः बरोबरच मुलांचे छंद जोपासताना त्यांनाही समाधान मिळत आहे. 

वाचन, लेखन संस्कृतीला चालना 
मला पूर्वीपासूनच वाचनाची आवड आहे. यापूर्वी मी मनमे है विश्वास, सिंधुताई सपकाळ, यशवंताव चव्हाण आदी पुस्तकाचे वाचन करुन ते दररोज संक्षिप्त रुपात शिक्षकांच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर शेअर करायचो. तो अनुभव पाठिशी असल्याने लॉकडाऊनच्या काळात राज्यभरातील वाचक रसिकांसाठी एक स्वतंत्र ग्रुप तयार केला आहे. त्यावर दररोज प्रत्येक जण काही ना काही वाचून त्याबद्दल त्यांचे विचार स्वतःच्या शब्दात व्यक्त करताहेत. त्यामुळे एकाच वेळी वाचन आणि लेखन संस्कृतीला चालना देण्याचे काम होतेय, याचे समाधान आहे. 
- जोतिराम बोंगे, प्राथमिक शिक्षक 

पुस्तके स्वत:वर प्रेम करायला शिकवतात 
मला वाचनाची पहिल्यापासूनच आवड आहे. लॉकडाऊनच्या काळात सदर आवड जोपासण्यासाठी भरपूर वेळ मिळतोय. व. पु. काळे हे माझे आवडते लेखक आहेत. गेल्याच महिन्यात ऑनलाईन मागविलेल्या पुस्तकांची सध्या सोबत करत आहे. जगावर, समस्त मानव जातीवर आणि हो स्वतःवर सुद्धा प्रेम करायला पुस्तके शिकवतात. तेव्हा एकदा पुस्तकांच्या जगात फेरफटका मारुन तर पहा, त्यातून पुन्हा बाहेर पडावसं वाटणार नाही. 
- कल्पना घाडगे, प्राथमिक शिक्षिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown gives scope for built in art