लोकमंगलने काढले शेतकऱ्याच्या नावावर परस्पर कर्ज 

प्रमोद बोडके
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी 
लोकमंगल शुगरच्या शेअर्स खरेदीसाठी व ठिबक सिंचन योजनेसाठी 2011 मध्ये आपण कारखान्याला सातबारा, मतदान कार्ड, आधारकार्ड, रेशनकार्ड दिले असून या कागदपत्रांचा गैरवापर करून माझ्या परस्पर लोकमंगल कारखान्याने कर्ज काढले असल्याचा आरोपही शेख यांनी यावेळी केला आहे. या कर्जाला जामीनदार म्हणून महेश देशमुख, आर. आय. विभूते यांच्या स्वाक्षरी आहेत. मी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून शासनाची व माझी फसवणूक कारखान्याने केली असल्याने कारखान्याचे चेअरमन, संचालक व कार्यकारी संचालक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही शेख यांनी या पत्रकार परिषदेत केली आहे. 

सोलापूर : माजी सहकारमंत्री व दक्षिण सोलापूरचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या परिवारातील सदस्यांशी निगडित असलेल्या लोकमंगल उद्योग समूहाचे आणखी एक नवे प्रकरण आज समोर आले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील भंडारकवठे येथे असलेल्या लोकमंगल साखर कारखान्याने इंडियन ओव्हरसिज बॅंकेतून शेतकऱ्याच्या नावावर दोन लाख 98 हजार रुपयांचे पीक कर्ज परस्पर घेतले आहे. याबाबतची तक्रार मंद्रूप येथील गुलाब नबीलाल शेख यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात केली आहे. 

aschim-maharashtra-news/solapur/warning-appointment-administrator-solapur-milk-union-260020">हेही वाचा - सोलापूर दूध संघावर प्रशासक नियुक्तीचा इशारा 
2016 मध्ये घेतलेल्या या कर्जाचे व्याज व कर्जाची रक्कम मिळून चार लाख 51 हजार रुपये झाले आहे. सीबील तपासल्यानंतर ही बाब आपल्याला समजली असल्याचेही शेख यांनी या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाची माहिती देण्यासाठी शेख यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाचे पुरावे व माहिती प्रसार माध्यमांना दिली. गेल्या दोन वर्षांपासून आपण स्वत: कर्ज काढण्यासाठी विविध बॅंकेत प्रयत्न करत होतो. कर्ज मिळत नसल्याने मी माझे सीबील तपासल्यानंतर ही बाब निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी सभापती अप्पाराव कोरे, सुभाष पाटील व शेखर बंगाळे आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lokmangal draws mutual loan in the name of the farmer