सोलापूर दूध संघावर प्रशासक नियुक्तीचा इशारा 

प्रमोद बोडके
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

दिग्गजांचा समावेश 
आमदार प्रशांत परिचारक, आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार दिलीप माने यांच्यासह सोलापूर जिल्हा दूध संघाच्या 17 विद्यमान संचालकांना नोटीस दिली आहे. सहकारी दूध संस्थांचे विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी बजावलेल्या नोटीसमुळे जिल्ह्याच्या राजकारणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. दूध संघाची निवडणूक तोंडावर असताना दूध संघाच्या कारभाराची चौकशी सुरू झाली आहे. 

सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघातील आर्थिक कारभाराबाबत पुण्याच्या दुग्ध विभागाचे विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी गंभीर ताशेरे ओढले आहेत. दूध संघातील आर्थिक व्यवहाराप्रकरणी त्यांनी दूध संघाला कारणे दाखवा नोटीस बजावली असून याप्रकरणी 17 फेब्रुवारी रोजी खुलासा करण्याची सूचना त्यांनी केली आहे. खुलासा न केल्यास अथवा असमाधानकारक खुलासा असल्याने संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून संघावर प्रशासक नियुक्त करण्याचा इशाराही त्यांनी या नोटिशीमध्ये दिला आहे. 

aschim-maharashtra-news/solapur/recruitment-mpsc-five-phases-259949">हेही वाचा - तरुणांनो खुशखबर! "एमपीएससी'ची पाच टप्प्यात भरती 
सोलापूर जिल्हा दूध संघाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, निविदा प्रक्रिया, दूध संघाच्या संकलनात सातत्याने होणारी घट, दूध संघाच्या वतीने देण्यात आलेल्या अनामत रक्कम, संघाच्या सहा विद्यमान संचालकांकडे असलेली थकबाकी, दूध संस्थांकडे असलेली थकबाकी, दूध संघाला झालेला तोटा, करमाळा शीतकरण केंद्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने पशुखाद्य आवक विक्रीमध्ये केलेला अपहार, सेवकांच्या बदल्या पदोन्नतीमध्ये योग्य ते धोरण न ठरवणे, प्राथमिक दूध संस्थांकडून करारनामा न करणे, 240 दिवसांपेक्षा कमी दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांवर पोट नियमानुसार कारवाई न करणे यासह 10 मुद्‌द्‌यांवर विभागीय उपनिबंधक शिरापूरकर यांनी गंभीर ताशेरे ओढले आहेत. 
हेही वाचा - कोरोना चिनमध्ये अन्‌ दहशत पंढरपूरमधील गावात 
दूध संघाच्या सभासदांच्या हितासाठी बाधा आणणारे कृत्य संघाकडून होत असल्याचा ठपका ठेवत दूध संघाचे संचालक मंडळ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 78 अ अन्वये तरतुदीनुसार कारवाईस पात्र असल्याचेही त्यांनी या नोटिशीमध्ये म्हटले आहे. याबाबतची नोटीस 1 फेब्रुवारी रोजी दूध संघाला व संचालकांना बजावण्यात आली आहे. या नोटीसवर 15 दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याची सूचनाही दूध संघाला करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warning of appointment of Administrator on Solapur Milk Union