मोठा निर्णय ! झेडपी-माध्यमिक शाळांमध्ये आता विलगीकरण कक्ष 

तात्या लांडगे
बुधवार, 25 मार्च 2020

निर्णयातील ठळक बाबी... 

  • परदेश प्रवास करुन आलेल्या अथवा परजिल्ह्यातील व्यक्‍तींसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष 
  • कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 14 व्या वित्त आयोगातून निधी खर्चास ग्रामपंचातीस परवानगी 
  • नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी, खासगी डॉक्‍टर, नर्सिंग स्टाफ भरण्यास मुभा 
  • सरपंच, ग्रामसेवकांकडील हातशिल्लक रक्‍कम आता एक हजारांहून 20 हजारांपर्यंत वाढविली 
  • जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांमध्ये स्थापन होणार विलगीकरण कक्ष : सुविधांसाठी मिळणार निधी 

सोलापूर : देशातील कोरोना या विषाणू बाधितांची संख्या वाढत असून गावोगावी कोरोनाच्या भितीने पुणे, मुंबईसह अन्य जिल्ह्यांमधून अनेकजण वास्तव्यास आले आहेत. त्यामुळे त्यांच्या विलगीकरणासाठी आता जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांमध्ये विलगीकरण कक्ष सुरु करण्यात येणार आहेत. त्याठिकाणी शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी 14 व्या वित्त आयोगातील निधी खर्चास ग्रामपंचायतींना मान्यता देण्यात आली आहे. 

हेही नक्‍की वाचा : धक्‍कादायक ! कोरोनाची भिती तरीही लाचेचे 63 गुन्हे 

परदेशातून प्रवास करुन आलेल्यांना होम कॉरन्टाईलमध्ये राहण्यास सांगूनही अनेकजण घराबाहेर फिरत आहेत. त्यांच्यासह गावातील नागरिकांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने आता सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी, खासगी डॉक्‍टर, पेरामेडिकल स्टाफ व नर्सिंग स्टाफ नियुक्‍त केला जाणार आहे. तसेच घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती घेण्यासाठी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स नियुक्‍त केल्या जाणार आहेत. त्याबाबत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बुधवारी (ता. 25) आदेश दिले. अत्यावश्‍यक सेवा तथा कामांसाठी सरपंच व ग्रामसेवकांकडील हातशिल्लक रकमेची मर्यादाही एक हजारांवरुन आता 20 हजारांपर्यंत वाढविली आहे. 

हेही नक्‍की वाचा : आश्‍चर्यकारक ! 48 तासांत पोलिसांत एकाही गुन्ह्याची नोंद नाही 

अंत्योदय, दारिद्रय रेषेखालील कार्डधारकांना मोफत साहित्य 
गावांमधील अंत्योद्य व दारिद्रय रेषेखालील कार्डधारकांना साबण, हॅण्डवॉश मोफत दिले जाणार आहे. तसेच प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांग व्यक्‍तींनाही ते साहित्य पुरविले जाणार आहे. जिवनाश्‍यक वस्तू त्यांना घरपोच दिल्या जातील, असेही प्रकाश वायचळ यांनी आदेशात नमूद केले आहे. तसेच परदेश प्रवास करुन आलेल्या व परजिल्ह्यातून गावोगावी आलेल्यांना जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांमध्ये स्थापन केलेल्या विलगीकरण कक्षात 14 दिवस निगराणीखाली ठेवले जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

हेही नक्‍की वाचा : मोठी बातमी ! 14 एप्रिलपर्यंत रेल्वे पूर्णपणे बंदच : 26 हजार कोटींचा फटका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharastra government dession Separation room now in ZP-Secondary schools