esakal | महेश कोठेंच्या प्रवेशावर आमदार संजय शिंदे का बसले गप्प? आता कोठेंनी धरला दुसरा मार्ग 

बोलून बातमी शोधा

Shinde_Kothe}

पक्षांतर्गत विरोधही वाढू लागल्याने महेश कोठे यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. त्यासाठी त्यांनी आमदार यशवंत माने, बळिराम साठे यांची मदत घेतली. मात्र, एमआयएम नगरसेवकांच्या प्रवेशासाठी तत्पर असणारे आमदार संजय शिंदे हे कोठेंपासून चार हात दूरच राहिले तर मनोहर सपाटे यांनीही त्यांना विरोध केला आहे. 

महेश कोठेंच्या प्रवेशावर आमदार संजय शिंदे का बसले गप्प? आता कोठेंनी धरला दुसरा मार्ग 
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : राज्याच्या सत्तेची दोरी शिवसेनेच्या हाती असतानाही सोलापूरच्या विकासासाठी कोणताही मंत्री, कोणताही मोठा नेता वेळ द्यायला तयार नाही. शहरात उद्योग, विमानसेवा, पाणीपुरवठा, बेरोजगारी असे अनेक प्रश्‍न आहेत. त्यासंदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरसविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदने देऊनही कोणीच लक्ष घातले नाही. दुसरीकडे, पक्षांतर्गत विरोधही वाढू लागल्याने महेश कोठे यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. त्यासाठी त्यांनी आमदार यशवंत माने, बळिराम साठे यांची मदत घेतली. मात्र, एमआयएम नगरसेवकांच्या प्रवेशासाठी तत्पर असणारे आमदार संजय शिंदे हे कोठेंपासून चार हात दूरच राहिले तर मनोहर सपाटे यांनीही त्यांना विरोध केला आहे. 

कॉंग्रेसच्या माध्यमातून 28 वर्षे महापालिकेचे राजकारण ताब्यात ठेवलेले महेश कोठे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी डावलली आणि कोठेंनी बंडाचे निशाण फडकावत अपक्ष निवडणूक लढविली. निवडणुकीतील पराभवानंतर त्यांना पक्षांर्तगत विरोध वाढू लागला आणि त्यांनी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. राज्यातील सत्ता गेल्यानंतर कोठे यांनी भाजपमध्ये जाण्याचा नाद सोडला आणि राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची मानसिकता तयार केली. मूळचे इंदापूरमधील असलेले यशवंत माने हे आता मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते आपले मित्र असून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे हे माझे मार्गदर्शक आहेत म्हणत कोठे यांनी मुंबई गाठली. 

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत सोलापूर शहरातील काहीजण राष्ट्रवादीत गेले. मात्र, कोठे यांचा तांत्रिक कारणास्तव प्रवेश लटकला. दरम्यान, कोठे यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील नगरसेवकांसह शिवसेनेतील 12 ते 14 नगरसेवक आहेत. एवढे सगळे नगरसेवक राष्ट्रवादीत आल्यानंतर महापालिकेतील शिवसेनेचे विरोधी पक्षनेतेपद धोक्‍यात येईल आणि राज्यभर त्याचा गवगवा होऊन विरोधकांना त्याचे भांडवल करणे सोयीचे होईल, अशी शक्‍यता जाणकारांनी वर्तविली. त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणुकांमध्ये कॉंग्रेस, शिवसेनेसोबत राष्ट्रवादीची महाविकास आघाडी होईल की नाही, यावर कोठे व त्यांच्या समर्थक नगरसेवकांच्या पक्षांतराचा अंतिम निर्णय होणार असल्याचीही चर्चा आहे. 

आमदार संजय शिंदेंचे दुर्लक्ष का? 
जिल्हा परिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले संजय शिंदे यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांमधील नेत्यांची समविचारी आघाडी तयार केली. त्यात माळशिरसचे उत्तमराव जानकर, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, अक्‍कलकोटचे मल्लिकार्जुन पाटील, मोहोळचे विजयराज डोंगरे, मंगळवेढ्याचे समाधान आवताडे, पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांचा समावेश होता. त्यांनी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची भेट घेतली आणि संजय शिंदे यांचा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्याचा मार्ग सुकर झाला. भाजपच्या 14 सदस्यांची ताकद घेऊन देशमुखांनी संयज शिंदे यांना अध्यक्षपदी बसविले. महेश कोठे हे राष्ट्रवादीत आल्यानंतर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. त्यांचा थेट विरोध आमदार विजयकुमार देशमुख यांनाच राहणार आहे. त्यामुळे संजय शिंदे कोठेंच्या बाबतीत लक्ष घालत नसल्याची चर्चा आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल