
माढा तालुक्यात बुधवारी (ता. १४) सरासरी १०६.९१ मिलीमीटर पाऊस झाला असून कुर्डुवाडीत विक्रमी १८४.६ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
माढा (सोलापूर) : माढा तालुक्यात बुधवारी (ता. १४) सरासरी १०६.९१ मिलीमीटर पाऊस झाला असून कुर्डुवाडीत विक्रमी १८४.६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. माढा तालुक्यात सर्वत्र पावसाने हाहाकार केला आहे. माढा वैराग वाहतूक उंदरगावनजीक सिना नदीवरील पुलावर पाणी आल्याने बंद झाली आहे. माढा तालुक्यातील अनेक रस्ते बंद आहेत.
हे ही वाचा : तहसीलदार समीर माने यांनी सुरू केली करमाळ्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी
माढा - बार्शी, माढा - वैराग, माढा - कुर्डूवाडी यासह इतरही रस्ते पावसाच्या पाण्यामुळे बंद आहेत. माढा - शेटफळ, बार्शी - कुर्डुवाडी, कुर्डुवाडी - पंढरपूर, कुर्डूवाडी - टेंभूर्णी वाहतूक सध्या सुरू झाली आहे. उंदरगाव, लोंढेवाडी, कुर्डूवाडी, माढा, लऊळ या गावांतील व्यापारी गाळे व काही ठिकाणी घरातही पावसाचे पाणी शिरले आहे. सिना नदीवरील उंदरगावचा पुल पाण्याखाली गेल्याने माढा - वैराग रस्त्याची वाहतूक बंद आहे. सिना नदीचे पाणी उंदरगाव, वाकावमधील काही घरात शिरले आहे.
नदीकाठच्या दारफळ, सुलतानपूर, निमगाव, उंदरगाव, केवड, वाकाव या गावांतील शेतीला व काही प्रमाणात निवासी भागाला पावसाचा फटका बसला आहे. रात्री सिना नदीच्या पुराच्या पाण्याने कमाल पातळी गाठली होती. सकाळपासून पाणी थोडेफार ओसरण्यास सुरूवात झाली आहे. बेंद ओढ्याला पाणी आल्याने माढा - बार्शी रस्ता बंद आहे. तर माढा - कुर्डूवाडी रस्त्यावरून केवळ मोठी वाहनेच जाऊ शकतात, अशी परिस्थिती आहे.
हे ही वाचा : अतिवृष्टीने उडाली मंगळवेढ्यात दाणादाण ! व्यापारी गाळ्यात पाणी शिरल्याने लाखों किंमतीच्या साहित्याचे नुकसान
माढा तालुक्यात बुधवारी सरासरी मिलीमीटर पाऊस झाला. तालुक्यात मंडळनिहाळ झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये - माढा - 85.6, कुर्डुवाडी - 184.6, टेंभुर्णी - 78, रांझणी - 105, दारफळ - 110, म्हैसगाव - 126.2 रोपळे (कव्हे ) - 127, लऊळ - 65.4, मोडनिंब - 80.4.
चाळीस वर्षांनंतर पहिल्यांदाच सिनेला मोठा पूर
सिना नदीला यापूर्वी २००७ साली पूर आला होता. त्यावेळीही पुलावरून पाणी गेले होते. पण २००७ पेक्षाही यावर्षी आलेले पाणी खूप जास्त असून मागील ४०-४५ वर्षांत पहिल्यांदाच एवढा मोठा पूर आल्याचे उंदरगावातील वरिष्ठ ग्रामस्थांनी सांगितले.
संपादन - सुस्मिता वडतिले