मराठा समाजाचा शनिवारी पंढरपूर ते मंत्रालय "आक्रोश मोर्चा'! 

भारत नागणे 
Wednesday, 4 November 2020

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने सरकार विरोधात पंढरपूर ते मंत्रालय (मुंबई) असा चारशे किलोमीटरचा पायी दिंडी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. येत्या शनिवारी (ता. 7) दुपारी पंढरपूर येथील विठ्ठलाचे दर्शन घेऊन मोर्चा मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने सरकार विरोधात पंढरपूर ते मंत्रालय (मुंबई) असा चारशे किलोमीटरचा पायी दिंडी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. येत्या शनिवारी (ता. 7) दुपारी पंढरपूर येथील विठ्ठलाचे दर्शन घेऊन मोर्चा मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे. आक्रोश मोर्चात राज्यभरातून सुमारे एक लाख मराठा बांधव सहभागी होणार आहेत, अशी माहिती सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक धनंजय साखळकर (अकलूज) यांनी दिली. 

तत्कालीन भाजप सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण दिले होते. परंतु ते आरक्षण न्यायालयात प्रलंबित आहे. राज्य आणि केंद्र सरकारने तमिळनाडू राज्याच्या धर्तीवर स्वतंत्र कायदा करून महाराष्ट्रातही मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. परंतु, राज्य आणि केंद्र सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गंभीर नाही. शिवाय राज्य सरकारही हा प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरले आहे, असा आरोपही श्री. साखळकर यांनी केला आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आता रस्त्यावरची लढाई लढण्याची वेळ आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी पंढरपूर येथून मंत्रालयापर्यंत पायी दिंडी आक्रोश मार्चा काढण्यात येणार आहे. 

मोर्चाच्या नियोजनासाठी गाव पातळीवर बैठका आणि चर्चासत्रे सुरू आहेत. मराठा आरक्षणासाठी काढण्यात येणाऱ्या या मोर्चामध्ये मराठा समाजाच्या सर्व संघटना सहभागी होणार आहेत. शनिवारी (ता. 7) दुपारी 12 वाजता महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल - रुक्‍मिणीचे दर्शन घेऊन मोर्चा निघणार आहे. मोर्चामध्ये मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती ठोक मोर्चाचे महेश डोंगरे, सुनील नागणे, दत्ता मोरे, भगवान माखणे यांनी केले आहे. 

असा असेल पंढरपूर ते मुंबई मोर्चा मार्ग 
पंढरपूर, तोंडले बोंडले, अकलूज, निमगाव केतकी, बारामती, पाटस, यवत, उरळी कांचन, हडपसर, शिवाजीनगर, आकुर्डी, तळेगाव दाभाडे, कामशेत, खोपोली चौक, पनवेल, नेरूळ, चेंबूर आणि मंत्रालय या मार्गे पायी दिंडी आक्रोश मोर्चा 18व्या दिवशी मुंबईतील मंत्रालयावर धडकणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Maratha community will march from Pandharpur to Mantralaya on Saturday