खासदार निंबाळकर म्हणतात, जिल्हा भाजपसोबत "हे' सरकार भक्कमपणे उभा राहील

दत्तात्रय खंडागळे 
शुक्रवार, 10 जुलै 2020

सांगोला येथे पार पडलेल्या सोलापूर जिल्हा भाजपच्या सर्व तालुकाध्यक्षांच्या बैठकीत प्रत्येक तालुक्‍याचा वैयक्तिक आढावा घेण्यात आला. कार्यकारिणी पूर्ण करणे, गटबाजी न करता भाजपच्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्रित काम करण्याच्या राज्य नेतृत्वाच्या सूचना, प्रत्येक तालुक्‍याच्या अडीअडचणी, कोरोना काळातील घरगुती व शेती पंपाचे वीजबिल माफ करण्यास शासनास भाग पाडण्यासाठी व बोगस बियाणे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. 

सांगोला (सोलापूर) : सोलापूर जिल्हा भाजपच्या माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुकाध्यक्षांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. केंद्र सरकार भक्कमपणे सोलापूर जिल्हा भाजपसोबत उभा राहील. तसेच केंद्राच्या योजना तळागाळापर्यंत पोचवा, असे आवाहन खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी सर्व तालुकाध्यक्षांना केले. 

हेही वाचा : सोलापूर जिल्ह्यात या वर्षी 50 हजार शेतकऱ्यांना मिळाले पीककर्ज 

सोलापूर जिल्हा भाजपच्या सर्व तालुकाध्यक्षांची बैठक सांगोला येथील हॉटेल सदानंद हॉलमध्ये खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख उपस्थित होते. जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्रीकांत देशमुख यांनी पहिल्याच जिल्हा बैठकीचे आयोजन कोरोनामुळे सोलापूर ऐवजी सांगोला येथे केले होते. या वेळी खासदार नाईक- निंबाळकर यांचा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नूतन जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा जिल्ह्यातील सर्व मंडल अध्यक्षांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या बैठकीत प्रत्येक तालुक्‍याचा वैयक्तिक आढावा, कार्यकारिणी पूर्ण करणे, गटबाजी न करता भाजपच्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्रित काम करण्याच्या राज्य नेतृत्वाच्या सूचना, प्रत्येक तालुक्‍याच्या अडीअडचणी, कोरोना काळातील घरगुती व शेती पंपाचे वीजबिल माफ करण्यास शासनास भाग पाडण्यासाठी व बोगस बियाणे, पीक विम्यातून जिल्ह्यातील वगळलेल्या गावांचा समावेश करणे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. 

हेही वाचा : ...अखेर "त्या' वृद्ध शेतकरी दाम्पत्याची घेतली तहसीलदारांनी बांधावर भेट..! 

प्रत्येक तालुक्‍याला स्थानिक व जिल्हास्तरीय सर्व नेत्यांना बरोबर घेऊन जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा जिल्हा दौरा करण्याबाबत चर्चा झाली. या वेळी बार्शीचे तालुकाध्यक्ष मदन दराडे, माळशिरसचे तालुकाध्यक्ष सोपान नारणवर, माढ्याचे तालुकाध्यक्ष संजय टोणपे, करमाळा तालुकाध्यक्ष महेश चिवटे, उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम, मोहोळ तालुकाध्यक्ष सतीश काळे, पंढरपूर तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल, सांगोला तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, अक्कलकोट तालुकाध्यक्ष शिवशरण, मंगळवेढा तालुकाध्यक्ष संतोष मोगले, बार्शीचे शहराध्यक्ष महावीर कदम, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते. 

या वेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील भाजपच्या सर्वच नेतेमंडळींना सोबत घेऊन जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांचा लवकरच दौरा करणार आहे. गट-तट विसरून भाजपच्या केंद्रातील योजना सामान्यांपर्यंत पोचवणे गरजेचे आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting of all BJP taluka presidents in the district under the chairmanship of MP Nimbalkar