esakal | "सत्तेचा गैरवापर कसा करावा, हे भाजपकडून शिकले पाहिजे !'

बोलून बातमी शोधा

Bachhu Kadu

पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक केंद्राने तीन महिने पुढे ढकलली असती तर आभाळ कोसळलं नसतं. सत्तेचा गैरवापर कसा करावा, हे भाजपकडून शिकले पाहिजे, असा आरोप करत बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला. 

"सत्तेचा गैरवापर कसा करावा, हे भाजपकडून शिकले पाहिजे !'
sakal_logo
By
विश्वभूषण लिमये

सोलापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या एकीकडे झपाट्याने वाढतीय तर दुसरीकडे पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवले जाताहेत. त्यामुळे पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक केंद्राने तीन महिने पुढे ढकलली असती तर आभाळ कोसळलं नसतं. सत्तेचा गैरवापर कसा करावा, हे भाजपकडून शिकले पाहिजे, असा आरोप करत बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला. 

राज्य सरकारच्या अखत्यारीतील सर्व निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत आणि काही ठिकाणी प्रशासकही नेमले आहेत. मात्र केंद्र सरकारने हा विचार न करता पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर केली, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. 

बच्चू कडू हे आज सोलापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी सोलापूर शासकीय रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली आणि आरोग्य अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या. 

पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके हे पक्ष संघटना बाजूला ठेवून शेतकरी प्रश्नावर आवाज उठवत होते. प्रसंगी आम्हाला मदत केली. म्हणून आम्ही त्यांच्या रिक्त जागेवर होत असलेल्या निवडणुकीसाठी त्यांच्या पुत्राला मदत करण्यासाठी प्रचारासाठी आलो आहोत. या मतदारसंघाची पोटनिवडणूक तीन महिन्यांनी लागली असती तरी चाललं असतं. मात्र केंद्राने ही निवडणूक लादली, असा आरोप करत, अस्तित्व दाखवण्यासाठी प्रचार करणं भाग आहे, असे म्हणत बच्चू कडू यांनी या मतदान संघामध्ये प्रचार सभांना होणाऱ्या गर्दीच्या प्रश्नावर काढती बाजू घेतली. 

दरम्यान, सोलापूरपासून 250 किलोमीटर अंतरावर असलेल्या हैदराबाद येथे कोरोना नियमांचे पालन केले जात नाही. मात्र महाराष्ट्र राज्यात नियमांचे पालन केले जात आहे. तरी देखील येथे कोरोना विषाणूने थैमान मांडला आहे, ही संशोधनाची बाब आहे. राज्यातील काही हॉस्पिटलमध्ये नियम पाळले जात नाहीत. राज्य शासनाने दिलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही. शासनाच्या आरोग्य योजनांमधून कोव्हिड रुग्णांना उपचार घेणे बंधनकारक असताना हॉस्पिटलकडून नियम पायदळी तुडवले जात आहेत. अशा रुग्णालयांवर कारवाई करणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल